सातगाव पठार परिसरातील स्थिती
पेठ, दि. 7 (वार्ताहर) – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे बटाटा लागवडीची कामे खोळंबली आहेत. मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या बियाणांची खरेदी केले आहे.
पेठ, पारगाव भावडी, कारेगाव, कुरवंडी आदी भागात साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात पावसाळी बटाटा पीक घेतले जाते. या वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला होता. जवळजवळ जून महिन्यातील तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावले होता. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने मंचर बाजार पेठेतून बटाटे बियाणे शेतकऱ्यांनी आणले आहेत. व्यापारी, हुंडेकरी व्यावसायिक यांनी बटाटे बियाणे शेतकऱ्यांना दिले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ओसरीत, शेडमध्ये बियाणे ठेवले आहेत, परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बटाटा लागवडीची कामे खोळंबली आहेत.