दावडी – निमगाव येथील खंडोबा मंदिरातील देवासमोरील ओवाळणी व दक्षिणा वाटून घेण्याच्या कारणावरून पुजाऱ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असून खेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिरामध्ये सोमवती अमावस्यानिमित्त सोमवारी (दि. 4) अनेक भाविक कुलाचार करण्यासाठी आले होते, त्यावेळी देवासमोर श्रद्धेने ओवाळणी व दक्षिणा भाविकांनी ठेवली होती. ही ओवाळणी व दक्षिणेचे सोमवारी रात्री सुमारास मंदिरासमोर पुजाऱ्यांच्यामध्ये वाटप सुरू असताना वादावादी झाली याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. याबाबत पुजारी भगवान रामभाऊ गुरव यांनी तक्रार दिली असून नानभाऊ धोंडिबा भगत, रोहित नानाभाऊ भगत, रवींद्र भिकाजी भगत यांच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी तर सुनेला धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे, तर पुजारी नानभाऊ धोंडिबा भगत यांनी दिलेल्या तक्रारी नुसार भगवान रामभाऊ गुरव, गणेश भगवान गुरव, कविता दत्तात्रय गुरव, वैभव दत्तात्रय गुरव यांच्या विरोधात शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जर पुजारीच जर दक्षिणेसाठी वादावादी करत असेल तर देवाला ओवाळणी द्यायची का नाही असाही प्रश्न भाविकांना पडला आहे.