– रामकुमार आगरवाल
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा अर्थात तुकाराम बीज 374 वा सोहळा उद्या रविवार (दि. 20) होत आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी, भाविक भक्तांची सुरक्षितता, सेवा व सोयीसुविधांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, स्वयंसेवक विविध सामाजिक संस्था शासकीय यंत्रणा स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देहूरोड पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवार व रविवार असे आज आणि उद्या असे दोन दिवस देहूत प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून, वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी आणि दिंड्यांचे आगमन सुरू आहे. वारकरी-भाविकांनी अखंड हरिनाम, कीर्तनासाठी घाटावर व अनेक ठिकाणी मंडप उभारल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूनी शेतात, मैदानात दिंड्यांनी मुक्कामासाठी आसरा घेतला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले भजन, हरिपाठ, चिपळ्या, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने पुण्य देहूनगरी भक्तिमय वातावरण दुमदुमत आहे.
उपलब्ध सुविधा
मुख्य मंदिरात 36, वैकुंठस्थान मंदिरात 16 सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत. आळंदी येथील स्वकाम सेवा आणि श्री श्री रविशंकर स्वयंसेवक सेवा पुरविणार आहे. भाविकांसाठी स्वच्छ पाणी, मोफत मास्क वाटप, दर्शनबारीने दर्शन घेताना भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी छताची सुविधा करण्यात आली आहे. करोना संकट पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने भाविकांनी मास्क नसणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे. सोशल डिस्टसिंग पाळावे. भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न करता दुरूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन मोरे, विश्वस्त हभप संजय मोरे, हभप विशाल मोरे, हभप संतोष मोरे, हभप अजित मोरे, हभप भानुदास मोरे, हभप माणिक मोरे यांनी केले आहे.
विद्युत रोषणाईने सजले देहू
वैकुंठस्थान मंदिर, मुख्य मंदिर, गाथा मंदिर, 14 टाळकरी कमानीवर तसेच देहूरोड येथील प्रवेशद्वारावर आकर्षक रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.देहूच्या सौंदर्यात भर वाढविणाऱ्या भव्य प्रवेशद्वारावर स्व. गोवर्धन काळोखे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल, भवानी माता यांसह विविध छाया चित्रांचे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या प्रवेशद्वारावर गत 20 वर्षांपासून गोवर्धन काळोखे विद्युत रोषणाई करीत होते. ही परंपरा राखत त्यांच्या कुटुंबीयांकडून यंदा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची, भाविकांची गर्दी होत आहे.