मंचर- महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील फुलेवाडी-बेडवस्ती येथे तरकारी पिके खाल्ल्याने विषबाधा होऊन 14 मेंढ्या आणि एका शेळीचा मृत्यू झाला. मेंढपाळाचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेंढपाळ पांडुरंग भीमाजी कोळपे हे दिवसभर मेंढ्या चारुन आणून फुलेवाडी येथील बेंडवस्तीतील रामदास डोके यांच्या शेतात मेंढ्यासह मुक्कामी होते. तेथे आजूबाजूला उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चारही बाजूंनी मेंढ्यांच्या संरक्षणासाठी वाघुर बांधून 350 मेंढ्या बसविण्यात आल्या होत्या. त्यापैकी अचानकपणे 14 मेंढ्या व एक शेळी मृत्युमुखी पडली. महाळुंगे पडवळ गावच्या पोलीस पाटील सविता पडवळ, वनविभागाचे कर्मचारी राजेंद्र गाढवे, वनपरिमंडल अधिकारी सोमनाथ खुंटे, वडगाव काशिंबेग येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जी. आर. हांडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शवविच्छेदनामध्ये मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. कोबी, फ्लॉवर व अन्य पिकांवर अळई किंवा रोगराई आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक व तणनाशकांची फवारणी करतात. पिकांवर औषधांचा अंश शिल्लक राहिल्याने ही पिके मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जी. आर. हांडे यांनी व्यक्त केला आहे.