लोणी काळभोर – डीजेच्या अतिआवाजाने व हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते. यामुळेच आवाजावर नियंत्रण ठेवावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही डीजे लावले जात आहेत. याला कंटाळून लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरातील एकूण 25 दुकानदारांनी या भागात एकाच जागेवर डिजे व लेझर लाईट लावण्यास परवानगी देण्यात येवू नये, अशी आग्रही मागणी एका अर्जाद्वारे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरात मुख्य रस्त्यालगत स्टेशनरी-कटलरी, किराणा, कासार, स्विट होम, भांडी, फोटो स्टुडिओ, फोटो फ्रेम, लेडीज शॉपी, टेलर, कपडे, झेरॉक्स, हॉटेल आदी दुकाने तसेच दाट लोकवस्ती आहे. आजकाल डिजेचे फॅड असल्याने कोणताही उत्सव, जयंती, वाढदिवस व इतर कोणतेही कार्यक्रम असले तरी डिजे लावला जातो. कार्यक्रम मळ्यात अथवा गावांत साजरा करण्यात येतो तर डिजे व लेझर लाईट शो मात्र अंबरनाथ भाजी मंडई नजीक वर्दळीच्या ठिकाणी केला जातो. मोठ्या आवाजामुळे ग्राहक मंडईत फिरकत नाहीत तसेच दुकानातील वस्तूही खाली पडतात. फर्नीचरच्या काचा तुटतात, झेरॉक्स व इतर मशीन बंद पडतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
राजकीय पुढारी अथवा त्यांचे कार्यकर्ते असे कार्यक्रम घेत असतात, अशाच कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला जात असल्याने कारवाई होतच नाही. नियंत्रणाहून अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेवाल्यांवर दंडात्मक व त्वरित कारवाई व्हायला हवी, असे या दुकानदार व नागरिकांचे सार्वत्रिक मत आहे. एखादा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर पोलीसांनी दिलेल्या परवानगी मध्ये आवाजावर मर्यादा असावी, असे नमूद केले जाते. व तो कार्यक्रम रात्री 10 नंतर सुरू राहिला तर पोलीस हस्तक्षेप करून तो बंद करण्याचा आदेश देतात. मात्र, लोणीकाळभोर मध्ये पोलीस प्रशासन डीजेवर मेहरबान का? असा सवाल सर्वसामान्याकडून उपस्थित केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलीस ठाण्याच्यावतीने कोणासही मोठ्या आवाजात डिजे लावण्याची परवानगी देण्यात येत नाही. यापुढील काळात नियमांचे उल्लंघन होत आहे हे निदर्शनास आले तर डिजे जप्त करून चालक, मालक व मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहोत. तशा सुचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
– सुरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर