व्यंकटेश भोळा
पुणे, दि. 12 – शहरातील काही संगणक टायपिंग इन्स्टिट्यूटची मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. उमेदवारांना संगणक टायपिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची बहुधा पूर्ण माहिती नसते. त्याचा गैरफायदा घेत इन्स्टिट्यूटकडून उमेदवारांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या टायपिंग इन्स्टिट्यूटवर अंकुश ठेवण्याची मागणी उमेदवारांतून होत आहे.
शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात लिपिक पदासाठी संगणक टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांना किमान 30 शब्द प्रतिमिनिट मराठी, 30 व 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजीचे टायपिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय लिपिक पदासाठी उमेदवार पात्र राहात नाही. त्यासाठी हजारो उमदेवार संगणक टायपिंग परीक्षेसाठी अर्ज करतात. मात्र, या अभ्यासक्रमास प्रवेश घेत असताना इन्स्टिट्यूटकडून लुबाडणूक होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शासनमान्य संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते. परिषदेमार्फत निकाल जाहीर केला जातो. मात्र, संगणक टायपिंग परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांना इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर इन्स्टिट्यूटद्वारे उमेदवारांचा अर्ज परीक्षा परिषदेकडे पाठविला जातो. परिषदेमार्फत वर्षातून दोनवेळा टायपिंगच्या परीक्षा घेतली जाते. जवळपास एका टायपिंग अभ्यासक्रमासाठी 4 हजार 400 रुपये शुल्क आहे. किमान लिपिक तरी होता येईल, या आशेने उमेदवारांचे संगणक टायपिंग कोर्सकडे कल वाढले आहे.
पूर्वी 30 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय 40 शब्द प्रतिमिनिट या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात नाही. मात्र, तत्कालीन परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी थेट 40 शब्द प्रतिमिनिट अभ्यासक्रमास उमदेवारांना प्रवेश घेण्यास मुभा असल्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी टायपिंग संस्थेकडून होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उमदेवारांना दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच, अनुत्तीर्ण उमेदवारांना थेट परीक्षेला बसता येते. त्यासाठी प्रति उमेदवार 500 रुपये शुल्क आहे. मात्र, संस्थेकडून अवाजवी शुल्क आकारून परीक्षेला बसू दिले जाते, याकडे उमेदवारांने लक्ष वेधले.
……………….
अनुभव 1
शहरातील एका संगणक टायपिंग संस्थेबद्दलचा कटू अनुभव उमेदवारांनी सांगितला. या संस्थेत थेट 40 शब्द प्रतिमिनिट या संगणक टायपिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेशासाठी चौकशी केली. मात्र, संस्थेने प्रथम प्रतिमिनिट 30 हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय प्रतिमिनिट 40 या संगणक टायपिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश देता येणार नसल्याचे निक्षून सांगितले. संबंधित उमेदवाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने थेट प्रतिमिनिट 40 प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेता येऊ शकतो, याचे परिपत्रकच संस्थेच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रवेश देण्यात आला.
………………….
अनुभव 2
एखादा विद्यार्थी संगणक टायपिंग परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास, त्याला फक्त परीक्षेची शुल्क भरून परीक्षा देता येऊ शकते, हा महाराष्ट्र राज्य परीक्षेचा नियम आहे. मात्र, त्याच संस्थेत फक्त परीक्षेला बसावयाचे आहे, किती शुल्क आहे, याची विचारणा केली. तर आमच्याकडे तशी पद्धत नाही. रेग्युलरच प्रवेश घ्यावा लागतो, असे एका संस्थेने सांगितले.
………………..
अनुभव 3
संगणक टायपिंग परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरला, तर रेग्युलर कोर्स न लावता अर्ज करून परीक्षा देऊ शकतो. एवढचे नव्हे, तर एक-दोन महिना संगणक टायपिंग संस्थेत सराव करण्याची संधी उलपब्ध असते. त्यासाठी महिन्याचे शुल्क विद्यार्थ्यांना संस्थेला द्यावे लागते. मात्र, त्यासाठी संस्थेकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना काहीच सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
बहि:स्थ टायपिंग अभ्यासक्रम सुरू करा
यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संगणक टायपिंग अभ्यासक्रम उमेदवारांना बहि:स्थ पद्धतीने घरी बसून पूर्ण करता येऊ शकतो. त्यासाठी उमेदवारांना थेट परीक्षेला बसता येईल, असा निर्णय घेतला होता. मात्र, बहुतांश संगणक टायपिंग संस्थेने परिषदेचा हा निर्णय हाणून पाडला. सध्या संगणकाचे युग आहे. सर्वांकडे संगणक, लॅपटॉप घरी उपलब्ध आहेत. मग बहि:स्थ टायपिंग अभ्यासक्रमास विरोध का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परिषदेने बहि:स्थ संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करावी, अशी मागणी होत आहे. त्याद्वारे उमेदवारांची लूट थांबण्याची चिन्हे आहेत.