मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार येतोय घायकुतीला
– कल्पेश भोई
चाकण, दि. 11 शासनाच्या विविध विकास प्रकल्पांमुळे चाकणसह खेड तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकत असल्याचे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी येथे खासगी सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. ही सावकारी एवढी वाढली आहे की, आता यांच्या दबावामुळे नागरिक घर सोडून जात असल्याचे चाकणमधील घटनेवरून अधोरेखित होत आहे.
माणसाला अडचणीतून सुटका करवून घेण्यासाठी अनेकांपुढे हात पसरावे लागतात. गरजेला पैसे उपलब्ध व्हावा म्हणून खासगी सावकाराच्या वळचणीतला जावे लागते. त्यातून दरमहा 5 टक्के ते 20 टक्क्यांपंर्यंत व्याजाची आकारणी होते. एकीकडे बॅंका वार्षिक नऊ ते 14 टक्के व्याजाने कर्ज देत असताना दुसरीकडे खासगी सावकारांच्या व्याजाचा दर वार्षिक 60 टक्के ते 240 टक्केइतका होत आहे. मुदलेच्या तिप्पट व्याज जाऊनही मुद्दल आहे तशीच राहत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. “कोपरापासून ढोपरापर्यंत खासगी सावकारांना सोलून काढणार,’ अशी घोषणा मंत्र्यांकडून होत असली तरी कायदा प्रभावी नसल्याने खासगी सावकारकी फोफावू लागली आहे.
शहरातील झोपडपट्ट्या, गल्ली बोळात, पेठा, व्यापार पेठांत खासगी सावकर आहेत. भिशी, लिलाव भिशी, बचत गटाच्या माध्यमातूनही खासगी सावकारकी फोफावते आहे. मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार घायकुतीला येतो. लाखो रूपये देणारेही बडे सावकार आहेत. त्यासाठी कोरा स्टॅंप, जमिनी, बंगले नावावर करून घेतले जातात. दर महिन्याला व्याज वसुलीसाठी पंटर नेमले जातात. व्याज न दिल्यास संबंधित व्यक्तीच्या घरातील साहित्य फेकून देणे, कर्जदाराला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत असले तरी अब्रुचा पंचनामा होईल या भीतीने किंवा जीव जाण्याच्या भीतीने याविरोधात कोणी आवाज उठवत नसल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना हात आखडता घ्यावा लागतो.
सावकारी नियंत्रण कायदा
खासगी सावकारकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे कैद व 25 हजार रूपये दंडाची तरतूद आहे. सावकारकीचा परवाना नसणाऱ्याला पाच वर्षे कैद व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. स्टॅंप लिहून घेतल्यास तीन वर्षे कैद व 25 हजार रूपये दंड आहे. शिक्षा कमी असल्याने खासगी सावकार मोकाट आहेत. व्याजाच्या वसुलीसाठी खुनाची धमकी देऊन कर्जवसुली केल्याबद्दल खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल खासगी सावकारावर अटकेची कारवाई होते. मात्र अटकेनंतर जामीन मिळाल्यानंतर पुन्हा सावकारकी सुरू होते. त्यामुळे पोलिसांकडूनच खटला दाखल करताना हयगय होता कामा नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
चाप कधी बसणार?
नोकरदार व व्यावसायिकांना धंद्यात लागणार पैसा, बाजारपेठमधील होणारे चढ-उतार वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची नितांत गरज असते यासाठी बॅंक, पतपेढी, खासगी सावकार याद्वारे अडचणीत असलेल्यांना पतपुरवठा केला जातो. यामध्ये खासगी सावकार हा पत पुरवठा करण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आहेत. बॅंकेचे, पतसंस्थेचे व्याजदर व खासगी सावकारांचे व्याजदर यामध्ये मोठी तफावत असून देखील गरजवंत असणारे कर्जदार मागील पुढील विचार न करता आपली आर्थिक निकड भागवण्यासाठी खासगी सावकारांच्या दावणीला स्वतःहून बांधले जातात. काही काळ व्याज भरून आपली सोडवणूक करून घेतात; मात्र काही काळानंतर हे व्याजाचे भूत मानगुटीवरून खाली उतरण्याचे काही नाव घेत नाही. प्रसंगी खासगी सावकार व त्यांच्या वसुली पंटरकडून कर्जदारास धाक दपटशाही वेळप्रसंगी मारहाण, घरातून उचलून नेण्याची भाषा, ठार मारण्याची भाषा आदी सर्व प्रकार अवलंबिले जातात यातून पुढे सर्व बाजूंनी पिचलेला कर्जदार पोलीस ठाण्याच्या आश्रयाला जाऊन या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करतात. तर काही जण भीतीपोटी “झाकली मूठ’प्रमाणे गप्प बसतात.