कृषी विभागाला दिले निवेदन
महाळुंगे इंगळे-शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाने ग्लायफोसेट तणनाशक बंदीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, याबाबत शेतकरी संघटनेने सरकारच्या प्रस्तावित असलेल्या ग्लायफॉसेट तणनाशक बंदीच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला एक लेखी निवेदन दिले आहे.
कृषि खात्यामध्ये ग्लायफॉसेट या तणनाशकावर बंदी घालण्यासाठी आवश्यक माहिती मागवली जात आहे, असे निदर्शनास आले आहे. ग्लायफॉसेटमुळे कॅन्सर होतो, या समजुतीमुळे बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. तथापि, टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राजेश दिक्षीत यांनी रसायनामुळे कॅन्सर होतो, हे खरे नसल्याचे स्पष्ट केले आहे. रसायनांच्या खूप संपर्कामुळे लिंफोमा कॅन्सर होऊ शकतो. पण या कॅन्सरचे प्रमाण भारतात खूप कमी आहे. पंजाब आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तथाकथित कॅन्सर साथीच्या अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कॅन्सर रूग्णांचे प्रमाण कमी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या ग्लायफॉसेट तणनाशकावर बंदी घालणे समर्थनीय नाही.
ग्लायफॉसेटवर बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेबरोबर चर्चा करावी. रास्त शास्त्रीय कारणासाठी बंदी होणार असेल तर, आमची मान्यता असेल. पण काही हितसंबंधी घटकाच्या दबावामुळे बंदी घातली गेली तर, आमचा निश्चित विरोध राहील. शेतीच्या हंगामात खुरपणीसाठी मजूर मिळत नाहीत. मजुराकरवी कामे वेळेवर होत नाहीत. मजुरावर भरमसाठ खर्च होतो. यामुळे शेती बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. तेव्हा आम्ही आग्रहपूर्वक विनंती करीत आहोत की, या संदर्भात कोणताही निर्णय आम्हाला विश्वासात घ्यावा. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला आमचा एकमुखी पाठिंबा असेल. अशी भूमिका शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने मांडण्यात आली.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, शेतकरी महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सीमा नरोडे, शेतकरी संघटना युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष अभिमन्यू शेलार, स्वतंत्र भारत पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष धनाजी धुमाळ, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे, शेतकरी संघटना माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, दौंड तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ फडतरे, खेड तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष बाबा पडवळ, खेड तालुका युवा आघाडीचे उपाध्यक्ष सुजित टाव्हरे, खेड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ लोणारी, खेड तालुका शेतकरी संघटना माहिती तंत्रज्ञान आघाडीचे अध्यक्ष तुषार लोणारी, खेड तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष निखिल शेवकरी, खेड तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीचे उपाध्यक्ष अतुल पाटील आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
- ग्लायफॉसेटवर बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटने बरोबर चर्चा करावी. रास्त शास्त्रीय कारणासाठी बंदी होणार असेल तर, आमची मान्यता असेल. पण काही हितसंबंधी घटकाच्या दबावामुळे बंदी घातली गेली तर, आमचा निश्चित विरोध राहील.
-अभिमन्यू शेलार, शेतकरी संघटना, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष