सातारा एलसीबीची पाटणमध्ये कारवाई; एक जिवंत काडतुस जप्त
पाटण, दि. 14 (प्रतिनिधी) –
पाटण शहारातील जुना स्टॅंड परिसरात कराड- चिपळूण रस्त्यावर एक गावठी रिव्हॉल्वर बाळगून मोटरसायकलवरून फिरणाऱ्या दोन तरूणांना सातारा येथील गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून अटक केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आकाश कोळी व सागर वीर (दोघेही रा. पाटण) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत पाटण पोलीसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पाटण येथील जुना स्टॅंड परिसरात दुचाकीवरून दोन तरूण गावठी रिव्हॉल्वर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीसांच्या पथकाने सापळा रचून देखरेख केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आकाश कोळी व सागर वीर हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. 50- 8519) कोयनानगरकडून येताना दिसले.
त्यांना पथकातील पोलीसांनी हाताने थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते दोघेही न थांबता पुढे निघून गेले. पोलीसांनी पाठलाग करून त्यांना अडवले. पोलीसांनी त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुस आढळले. चौकशी केली असता रिव्हॉल्व्हर बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा पाटण पोलीसांत नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार मोहन नाचण, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कचरे, धीरज महाडीक, केतन शिंदे, मयुर देशमुख, वैभव सावंत यांनी केली.