चौघे अद्याप फरार : चाकणमधील प्रकार
चाकण- चाकण व परिसरातील वेगवेगळ्या खासगी सावकारांकडून लाखो रुपये व्याजाने घेतलेल्या कर्जदाराकडून व्याजाचे पैसे वसूल करून देखील या सावकारांनी मिळून कर्जदाराला जादा व्याजाचा तगादा लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक अटक केली होती. त्यांना खेड न्यायालयात मंगळवारी (दि. 11) हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. तर चौघे अद्याप फरार आहेत.
महालक्ष्मी फायनान्सचे मंदार परदेशी, रंगा ठोंबरे, किशोर जगनाडे, अस्लम शेख, सचिन परदेशी (सर्व रा. चाकण) असे जामिनावर सुटका झालेल्यांची नावे आहेत.तर दत्ता खेडकर, विजू रत्नपारखी, सचिन शेवकरी, गारगोटे अशी फरार असणाऱ्यांची नावे आहेत. तर माधुरी विशाल सायकर (वय 25, रा. आनंदनगर, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना आनंद नगर सोसायटी, रोहकल रस्ता चाकण येथे घडली होती. माधुरी यांचे पती विशाल यांनी 2017 मध्ये मंदार परदेशीकडून दरमहा आठ टक्के दराने पाच लाख रुपये, रंगा ठोंबरेकडून दरमहा आठ टक्के दराने तीन लाख रुपये, गारगोटेकडून दरमहा पाच टक्के दराने पाच लाख रुपये, अस्लमकडून सात टक्क्यांनी सहा लाख, सचिन शेवकरी आणि दत्ता खेडकर या दोघांकडून दहा टक्क्यांनी सहा लाख रुपये आणि महालक्ष्मी फायनान्सचे तीन लाख रुपये सहा टक्के व्याज दराने घेतले होते. वरील सर्व खासगी सावकारांकडून विशाल सायकर यांनी एकूण 28 लाख रुपये व्याजाने घेतले. त्याचे व्याज त्यांनी वेळोवेळी दिले. तरीही यातील काही सावकारांनी त्यांच्या दुकानावर येऊन तसेच फोनवरून पैशांबाबत तगादा लावला. शनिवारी (दि. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास सचिन शेवकरी, दत्ता खेडकर या दोघांनी सायकर यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सायकर हे घर सोडून गेले आहेत, असे फिर्यावदित नमूद केले आहे.
खासगी सावकारकीला चाप कधी लागणार?
नोकरदार व व्यावसायिकांना धंद्यात लागणार पैसा, बाजारपेठ मधील होणारे चढ-उतार वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची नितांत गरज असते यासाठी बॅंक पतपेढी खाजगी सावकार याद्वारे अडचणीत असलेल्या पतपुरवठा केला जातो. यामध्ये खासगी सावकार हा पत पुरवठा करण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आहेत. बॅंकेचे, पतसंस्थेचे व्याजदर व खासगी सावकारांचे व्याजदर यामध्ये मोठी तफावत असून देखील गरजवंत असणारे कर्जदार मागील पुढील विचार न करता आपली आर्थिक निकड भागवण्यासाठी खासगी सावकारांच्या दावणीला स्वतःहून बांधले जातात. काही काळ व्याज भरून आपली सोडवणूक करून घेतात मात्र काही काळानंतर हे व्याजाचे भूत मानगुटीवरून खाली उतरण्याचे काही नाव घेत नाही. प्रसंगी खासगी सावकार व त्यांच्या वसुली पंटरकडून कर्जदारास धाक दपटशाही वेळप्रसंगी मारहाण, घरातून उचलून नेण्याची भाषा, ठार मारण्याची भाषा आदी सर्व प्रकार अवलंबिले जातात यातून पुढे सर्व बाजूनी पिचलेला कर्जदार पोलीस ठाण्याच्या आश्रयाला जाऊन या खासगी सावकारांन विरुद्ध गुन्हा दाखल करतात. तर काही जण भीती पोटी झाकली मूठ प्रमाणे गप्प बसतात.