तीन नराधमांवर गुन्हा : औरंगाबाद येथे केले दुष्कृत्य
महाळुंगे इंगळे- आई आजारी असल्याचा बहाणा करून तिघा नराधमांनी 27 वर्षीय लेकुरवाळीला चाकण येथून औरंगाबाद येथे फूस लाऊन नेले. औरंगाबादमध्ये नेल्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून आणि गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकण पोलिसांनी याप्रकरणी रविवारी (दि. 12) औरंगाबाद येथील तीन नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल,आसेफिया कॉलिनी, जयभीमनगर, औरंगाबाद) याच्यासह मतीनचा मेहुणा हमीद सिद्दिकी व मतीनचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद (दोघेही रा. औरंगाबाद) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात बलात्कार व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेने फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे होते. ओळखीचा गैरफायदा व तीच्या असहाय्यतेचा फायदा घेत पीडितेला तिची आई आजारी असल्याचे कारण सांगून फसवून तिच्या दोन लहान मुलांसह मतीन सय्यद याने खराबवाडी (ता. खेड) येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधून औरंगाबाद येथे नेले. औरंगाबादमध्ये एका घरामध्ये डांबून ठेवून या महिलेला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी तिघांनी संगनमताने बलात्कार केला. तसेच औरंगाबाद येथील एका लॉजवर नेल्यानंतर मतीनचा भाऊ व मेहुणा यांनी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करून तिचा विनयभंग केला. संबंधित घटना नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये घडली असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.