अनधिकृत पाणी उपसाप्रकरणी चासकमान पाटबंधारेची कारवाई
रांजणगाव गणपती – कोंढापुरी (ता. शिरूर) येथील शासकीय तलावांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा केल्याप्रकरणी शेळके बेव्हरेज कंपनी व्यवस्थापनला दोन कोटी 71 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांनी दिली. चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक चार शिरूर या कार्यालयाने ही दंडात्मक पाणीपट्टी भरण्याचे आदेश कंपनीच्या मालकाला दिले आहे.
कोंढापुरी येथील शासकीय तलावांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा करून या तलावांमध्ये प्रदूषण करत असल्याचा आरोप व तक्रार अक्षय गायकवाड यांनी प्रदूषण विभागाकडे व चासकमान विभागाकडे केली होती या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. शासकीय तलावांमधून संबंधित कंपनीकडून पिण्याचे बाटलीबंद पाणी व इतर उत्पादनांसाठी पाणी उपसा केला जात होता व शासन अहवालातही बाजू एकदम स्पष्ट झाल्याने व प्रत्यक्ष पाहणीमध्ये निदर्शनास आल्याने संबंधित कंपनीवर सन 2011पासून ते सन 2019पर्यंत दोन कोटी 71 लाख 95 हजार 540 रुपयांची पाणीपट्टी भरण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. ही पाणीपट्टी तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम त्वरीत जमा करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश पत्राद्वारे प्रशासनाने कंपनीला दिला आहे. दरम्यान कंपनीचे व्यवस्थापक शेळके यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.