कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाचा आज सातवा दिवस. करवीर निवासिनी आई श्री अंबाबाईची आज (शनिवार) महालक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. आदि शंकराचार्य विरचित कनकधारा स्तोत्रावर आधारित ही पूजा बांधण्यात आली.
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची आज नवरात्रीच्या सातव्या दिवशी कनकधारा स्तोत्रावर आधारित महालक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्रामधून लक्ष्मी अथवा महालक्ष्मीची करूणा भाकली आहे. संन्यस्त होण्याआधी जेव्हा बालशंकराचार्य भिक्षा मागण्याकरता एका घरी गेले तेव्हा त्या दरिद्री घरातील स्त्रीने घरात राखून ठेवलेला एकच आवळा अत्यंत निस्पृह मनाने आचार्यांना भिक्षेत वाढला आणि आपण या पलीकडे काही देउ शकत नाही याचे दु:ख व्यक्त केले. आचार्यांना अत्यंत करूणा येउन त्यांनी लक्ष्मीची करूणा भाकली तेच हे एकवीस श्लोकी कनकधारा स्तोत्र.
या स्तोत्रामुळे प्रसन्न होउन लक्ष्मीने त्या दरिद्री कुटुंबावर सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. या स्तोत्रामध्ये आचार्यांनी लक्ष्मीलाच कधी सरस्वती तर कधी पार्वती मानले आहे. मंदार मुनीश्वर, अशितोश ठाणेकर, केदार मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली.