रिटर्न पॉलिसीमधील कमतरता शोधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा अपहार
पुणे,दि.8- ऍमेझॉन कंपनीला त्यांच्याच कर्मचाऱ्याने 24 लाखांचा गंडा घातला आहे. कंपनीच्या रिटर्न पॉलिसीतील कमतरता शोधून काढून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा अपहार केला. याप्रकरणी दोघांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून अपहार केलेल्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अचल अमोल माणगावकर(रा.आनंद पार्क, धानोरी, मूळ सावंतवाडी, सिंधुदुर्ग) आणि राशिद जुम्मन चौधरी(26,रा.मुंजोबा वस्ती धानोरी अशी अटक आरोपींची नावे आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, ऍमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे विविध वस्तूंची विक्री केली जाते. त्याकरिता ग्राहकाला कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध करून दिली गेली आहे. दरम्यान, ऍमेझॉन कंपनीला वारंवार काही ठराविक आयडीवरून बुकींग झाल्याचे निदर्शनास येत होते. सदर आयडीवरून झालेल्या बुकिंगकरिता कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन निवडला जात होता. ग्राहक सदरची वस्तू रिटर्न करत होता. मात्र, कंपनीस ही वस्तू रिटर्न मिळत नव्हती. ग्राहकाने रिटर्न पर्याय निवडल्याने कंपनी ग्राहकास नवीन वस्तू पाठवत होती. त्याकरिता कोणतेही पैसे घेतले जात नव्हते. ग्राहकाने सदर वस्तू रिटर्न केली आहे. याची कुठलीही नोंद मात्र ऍमेझॉनच्या सिस्टीममध्ये अपडेट होत नव्हती. याचाच फायदा कंपनीमध्ये काम करत असलेल्या राशिद चौधरीने घेतला. याद्वारे त्याने कंपनीची फसवणूक केल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात दाखल आहे.
...आयडीवरून प्रकार उघड
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना सायबर क्राईम पोलिसांना ऍमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरून वारंवार एकाच आयडीवरून हा प्रकार होत असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती कंपनीकडून प्राप्त करुन घेतल्यावर सायबर क्राईमच्या एका पथकाने सावंतवाडी येथून अचल माणगावकर याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने ऍमेझॉन कंपनीत काम करणारा त्याचा साथीदार राशिद चौधरी याचे नाव सांगितले. दोघांनाही अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 24 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सर्व वस्तू इलेक्ट्रॉनिक्स होत्या.
...असा रचला अपहाराचा कट
अचल आणी राशिद या दोघांची त्यांच्या एका कॉमन मित्रामार्फत ओळख झाली होती. अचल याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे तर राशिदने वाणिज्य शाखेचे पदवी घेतली आहे. दोघेही एकाच परिसरात काही वर्षे रहायला होता. राशिद हा तीन वर्षे ऍमेझॉनच्या कस्टमर केअर विभगात कामाला होता. येथे कामाला असताना त्याने ग्राहकांच्या रिटर्न वस्तूंच्या अनेक केसेस पाहिल्या होत्या. यात त्याला ग्राहकाने वस्तू रिटर्न केल्यावर त्याचे डेपोतील रजिस्टरमध्ये नोंद होत नसल्याचे लक्षात आले. यामुळे त्याने रिटर्न आलेल्या वस्तूंमधील टी शर्ट आणी शूज अशा वस्तू अचलसह स्वत:साठी काही दिवस वापरून परत ठेवल्या होत्या. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढल्यावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा अपहार करण्यास सुरवात केली. तो कंपनीला ग्राहकाकडून आलेल्या वस्तू रिटर्न केल्याचे सिस्टीममध्ये दाखवायचा मात्र त्या प्रत्यक्षात रिटर्न केल्या जात नव्हत्या. यातील एक दोन वस्तू त्याने ओएलएक्सवर विकल्या होत्या.
या प्रकरणाचा तपास अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर संभाजी कदम, पोलीस उपायुक्त विशेष शाख मितेश घट्टे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, सहायक पोलीस निरीक्षक पानमंद, पोलीस कर्मचारी गावडे, हंडाळ, वाव्हळ, पोतदार, वेताळ, जाबा, निकम, जाधव, पुंडलिक, भोरडे, शेख यांच्या पथकाने केली.