सेऊल, (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियामधून आज दक्षिण कोरियाच्या दिशेने दोन क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. आण्विक सामर्थ्याच्या मुद्दयावरून निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी अमेरिकेचे दूत आज दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले. त्या भेटीच्या दरम्यानच ही क्षेपणास्त्रे डागली गेली आहेत. उत्तर कोरियासाठीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टेफन बायगन हे बुधवारी दक्षिण कोरियाला आले आहेत. त्यांच्या या भेटीला उत्तर कोरियाने आक्षेप घेतला आहे. आठवड्याभराच्या आत दुसऱ्यांदा अशी क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडून उत्तर कोरियाने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.
उत्तर कोरियाने शनिवारी लष्करी युद्ध सरावादरम्यान अनेक “प्रोजेक्टाईल’ (निश्चित दिशा दिलेली क्षेपणास्त्र) सोडली होती. यापैकी एक क्षेपणास्त्र लघु पल्ल्याचे असल्याचे समजते आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यातील पहिल्या शिखर परिषदेपूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या दिशेने क्षेपणास्त्रे सोडली होती. मात्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये व्हिएतनाममध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली होती.