- मोठी मागणी दरांमध्ये 20 ते 40 टक्क्यांची वाढ
- लॅपटॉपचे भाडे तीन हजारांवरुन थेट पाच हजारांवर
पिंपरी – गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन शॉपिंग साइटमुळे मंदीचा मार झेलत असलेल्या इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना गेल्या काही दिवसांमध्ये भरभराटी दिवस पहायला मिळत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, इंटरनेट डोंगल आणि लॅपटॉपला ऍटेच होणारे की-बोर्ड आणि माउस, हार्ड डिस्क, दुरुस्तीचे साहित्य यांची मागणी प्रचंड वाढली आहे. काही वस्तुंचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे, तर काही वस्तुंचा वितरकांना कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. दरम्यान “वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
“करोना’मुळे बहुतेक सर्वच कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’ला सुरुवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी लॅपटॉपच्या मागणी अचानकच उसळी घेतली आहे. लहान कंपन्यांनी लॅपटॉप विकत घेण्याचा प्रयत्न केला तर ज्या कंपन्यांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत, ते लॅपटॉप भाड्याने घेत आहेत. पूर्वी जे लॅपटॉप दरमहा तीन हजार रुपये भाड्याने मिळत होते आता ते पाच हजार रुपये भाड्याने मिळत आहेत. अशाच प्रकारे की-बोर्ड, माऊस आणि इंटरनेट डोंगलच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.
कंपन्यांना संगणक दुरुस्ती व इतर सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांची सध्या प्रचंड धावपळ सुरु आहे. एकीकडे बाजारात काही वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि वितरकांनी काही वस्तूंचा तुटवडा निर्माण करुन नफाखोरी सुरु केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे कंपन्यांना सेवा देणाऱ्या हे व्यावसायिक कात्रीत अडकले आहेत. त्यांना कंपन्यांकडून जादा दर वसूल करता येत नाही आणि दुसरीकडे नियमित दरांमध्ये वितरक वस्तू देण्यास तयार नाहीत.
जमाखोरी आणि नफाखोरी
वितरकांनी स्टॉक असूनही काही वस्तू मुद्दाम रोखून धरल्या आहेत. पूर्वी 23 ते 24 हजारांना मिळणाऱ्या लॅपटॉपचे 27 ते 28 हजार रुपये वसूलले जात आहेत. तसेच दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे पॅन ड्राइव्ह देखील पाचशे रुपयांना विकले जात आहेत. हार्ड डिस्कच्या किंमतीतही पाचशे ते हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
जुन्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपलाही मागणी
सध्याच्या काळात जुन्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपलाही मागणी आली आहे. यातही दर वाढवून देण्यात आले आहे. दैनिक “प्रभात’ने केलेल्या पाहणीत काही व्यावसायिक जीएसटीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळत आहेत, परंतु जीएसटीचे बिल मात्र देत नाही. जीएसटीचे बिल मागितल्या आणखी किंमत वाढवून मागितली जात आहे. एकंदरीतच काही मोजक्या बड्या व्यावसायिकांनी “करोना’चा पुरेपूर फायदा घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.