इराणबरोबरच्या वाढत्या तणावामुळे सुरक्षिततेचे पाऊल
वॉशिंग्टन – इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावास आणि आरबिट येथील वाणिज्य दूतावासातील अनावश्यक कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्याचे आदेश अमेरिकेने दिले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यानचा तणाव वाढू लागला आहे. त्यामुळे इराणच्या शेजारील इराकमधील दूतावासांमध्ये केवळ आवश्यक असतील तेवढेच कर्मचारी ठेवण्यात यावेत, असे आदेश अमेरिकेने दिले आहेत.
इराकमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय असणे आणि यापूर्वी दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांची दखल घेऊन अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने इराकमधील दूतावास अंशतः बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इराकमधील दहशतवादी संघटनांमध्ये अमेरिकेविरोधातील संघटनांचा समावेश आहे. त्या संघटनांमुळे इराकमधील अमेरिकेच्या नागरिकांना आणि पाश्चिमात्य कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने इराणवर मोठा दबाव आणला आहे. इराणने आखातात काही महत्वाच्या ठिकाणी हल्लेही केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. संभाव्य कारवाईची गरज लक्षात घेऊन अमेरिकेने आखातामध्ये लढाऊ विमानवाहू नौकाही तैनात केल्या आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणावाबाबत रशियाकडून मात्र चिंता व्यक्त केली गेली आहे.