जुन्नर- जुन्नर तालुक्यातील उपलब्ध 213 जागांपैकी 200 अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले असून, त्यांपैकी 7 अर्ज अपात्र ठरले असून 193 विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) समाजातील दुर्बल गटांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने 25 टक्के कोटा खुला केला असून ऑनलाइन सोडतीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती मेमाणे यांनी दिली.
समाजातील दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थी, एससी-एसटी संवर्गातील विद्यार्थी, विधवा-घटस्फोटित महिलांची मुले, दिव्यांग मुले अशा खऱ्या अर्थाने गरजूंसाठी हा 25 टक्क्यांचा कोटा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आला आहे; परंतु काही सधन पालक याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून आल्यामुळे पालकांनी दिलेल्या उत्पन्नाच्या अर्जाची तहसीलदारांमार्फत फेरतपासणी होणार आहे. अशा 82 पालकांची यादी तहसील कार्यालयाकडे चाचपणीसाठी पाठविली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये थोडीशी चिरीमिरी दिल्यास उत्पन्नाचे किंवा इतर दाखले आपल्याला पाहिजे तसे मिळत असल्याचा अनेकांना अनुभव आहे. या पालकांनी दिलेले रहिवासी दाखलेही पोलीस स्टेशनमार्फत तपासले जाणार असल्याची माहिती मेमाणे यांनी दिली. या आरटीई कायद्यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून संबंधित शाळेने कुठल्याही प्रकारचे शिक्षण शुल्क आकारल्यास त्या संस्थेवर कारवाई होणार असल्याचा इशारा गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिला आहे.