लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, खडकवाडी, मांदळेवाडी येथे प्रत्येकी एक अशा तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धामणी येथील 55 वर्षीय, खडकवाडी येथील 45, तर मांदळेवाडी येथील 30 वर्षीय युवकाला करोनाची लागण झाली आहे. धामणी येथील 55 वर्षीय व्यक्तीला पाच दिवसांपूर्वी लागण झाली तर खडकवाडी व मांदळेवाडी येथील दोघांचे अहवाल गुरूवारी (दि. 6) पॉझिटिव्ह आले आहेत. जरी या भागात रुग्ण आढळला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
कामाशिवाय बाहेर पडू नये. बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा. सध्या पाऊस सुरू झाला आहे. हवेतील वातावरण बदलले आहे. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्यास नागरीकांनी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन धामणी येथील आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी केले आहे.