शिवतेजसिंह मोहिते-पाटील ः ग्रामपंचायतीने 24 ठिकाणी बसवले कॅमेरे
अकलूज- अकलूजमधील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहवा, या उद्देशाने अकलूज ग्रामपंचायतीने शहरात 24 ठिकाणी 45 लाख रुपयानचे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच या कॅमेरांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहीते-पाटील यांनी दिली.
वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण होत चालले आहे. पोलिसांना प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून लक्ष ठेवणे अशक्य होत आहे. अकलूज शहरातील या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करत सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माजी खासदार विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहारात महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या चौकात कॅमेऱ्यांसोबत स्पीकर बसवण्यात आले आहेत, जेणेकरून महत्त्वाच्या सुचनासुध्दा देण्याची व्यवस्था होणार आहे, तर 360 अंशात कॅमेरे फिरण्याची व्यवस्था असून, दिवसा 100 व रात्री 30 मिटरपर्यंत 24 तास कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. अकलूज ग्रामपंचायत कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
अकलुज शहरात सतत काहीतरी गुन्हेगारीचे अनुचित प्रकार घडत असतात,सीसीटीव्ही कमेऱ्यामुळे गुन्हेगारीला चांगलीच जरब बसणार आहे. मुलींची छेड काढणारे रोडरोमीओ, भुरटे चोर, रस्त्यात वाहने लावुन वाहतुकीस अडथळा आणणारे वाहन धारक, अपघाता नंतर पलायन करणारे वाहनधारक हे आत्ता कायद्याच्या कचाट्यातुन सुटू शकणार नाहीत.अकलुज शहरात सीसीटीव्ही कॅर्मेयामुळे चांगली शिस्त लागेल व गुन्हेगारीला आळा बसेल यामुळे नागरीकामधुन समाधान व्यक्त होत असून ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल कौतुक होत आहे.
- 14 चौकांत 71 कॅमेरे
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून 45 लाख रुपये खर्चाचे एकूण 96 कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे. सध्या अकलूज शहरातील महर्षी चौक, रत्नपुरी चौक, जयसिंह चौक, राऊत नगर, गांधी चौक, विजय चौक, भाजी मंडई येथे दोन ठिकाणी, अण्णा भाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, ग्रामपंचायत कार्यालय, रमामाता चौक, अकलाई मंदिर, शिवसृष्टी किल्ला, कर्मवीर चौक, प्रतापसिंह चौक, सदभाऊ चौक, दत्त चौक, काझी गल्ली, रामायण चौक, महर्षी कॉलनी, ब्लड बॅंक, मार्केट यार्ड, क्रीडा संकुल या ठिकाणी 71 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.