तामीळनाडूत पन्नीरसेल्वम गट भाजपशी युती करणार?

ट्‌विटमुळे राजकीय गदारोळ; नंतर सारवासारव
चेन्नई – तामीळनाडूच्या सत्तारूढ अण्णाद्रमुकमधील पन्नीरसेल्वम गटाने भाजपशी युती करण्याची तयारी चालवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांच्या एका ट्विटमुळेच या चर्चेला तोंड फुटून राजकीय गदारोळ सुरू झाला. त्यानंतर या गटावर सारवासारव करण्याची वेळ आली.
तामीळनाडूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भाजपशी युती करण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे ट्‌विट पन्नीरसेल्वम यांनी केले. त्याचे लगेचच पडसाद उमटून अण्णाद्रमुकच्या विरोधी गटांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे काय होणार आणि अण्णाद्रमुकमधील फुटीवर शिक्कामोर्तब होणार का, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे पन्नीरसेल्वम गटाने संबंधित ट्विट हटवला. तसेच, कुठल्याही पक्षाशी युतीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच घेतला जाईल असे आम्हाला म्हणायचे असल्याचे स्पष्टीकरण त्या गटाकडून देण्यात आले. तामीळनाडूशी संबंधित मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्यासाठी पन्नीरसेल्वम यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ आज पन्नीरसेल्वम यांनी केलेला ट्‌विट चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे पन्नीरसेल्वम गट भाजपच्या जवळ जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)