होळकरवाडीत पूर्ववैमनस्यातून दोघांना बेदम मारहाण

प्रातिनिधिक फोटो

लोणी काळभोर- दोन दिवसांपूर्वी झालेले भांडण मिटवले. याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांना लोखंडी कोयता, लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना होळकरवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे. याप्रकरणी कुमार मारूती झांबरे (वय 25, रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभूराजे भोसले (रा. मयूर पार्क, हंडेवाडी ता. हवेली), सनी मोहन शेवाळे, चिराग शेवाळे आणि बालाजी पवार (तिघेही रा. शेवाळवाडी, ता. हवेली), सागर औताडे (रा. औताडवाडी), निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर आणि मयूर जंगमवाड (चौघेही रा. हंडेवाडी, ता. हवेली) या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कुमार आणि गणेश झांबरे या दोन भावांना मारहाण करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.24 ऑक्‍टोंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी येथील स्टीलच्या गोडावून समोर झांबरे यांचे मित्र एकनाथ सुर्वे (रा. औताडेवाडी) आणि शंभूराजे भोसले या दोघांचे वाहन घासल्याच्या कारणांवरून किरकोळ भांडण झाले. ते भांडण गणेश झांबरे यांने मिटवून तो घरी आला. काही वेळाने भोसले आपल्या मित्राला बरोबर घेऊन तेथे आला. गणेश याला “तु भाई लागून गेलास काय? आमचे भांडण सोडवण्यासाठी का आलास?’ असे म्हणून ते दोघे तेथून निघून गेले.
शुक्रवारी (दि. 26 ऑक्‍टोबर) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कुमार आणि गणेश झांबरे हे दोघे भाऊ आपला मित्र सागर हिंगे यांचेसमवेत होळकरवाडी जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर थांबले होते. यावेळी पाच दुचाकीवरून नऊजण आले. शंभूराजे भोसले याने गणेश यास शिवीगाळ केली. “तु काय भाई लागून गेलास काय?’ असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून हिंगे घाबरून बाजूला निघून गेला. यानंतर कुमार याने शंभूराजे यास भावाला “मारहाण करू नकोस. काय असेल ते नंतर पाहू’ असे म्हणाला. याचा राग शंभूराजे यास आला आणि त्याने हातात लोखंडी कोयता घेऊन त्याचेवर धाऊन गेला. “तु कोण लागून गेलास? तुला जिवंत रहायचे आहे का? तुला मारूनच टाकतो’, असे म्हणून त्याने डोक्‍यावर मारण्यासाठी कोयता उगारला. कुमार याने प्रसंगावधान राखून आपला उजवा हात आडवा केला. त्यामुळे वार हाताच्या तळव्यावर बसला.
याचवेळी “तुला जिवे ठार मारून टाकतो’, असे म्हणून डोक्‍यावर वार केला. सनी शेवाळे याने लाकडी दांडक्‍याने तर चिराग शेवाळे याने लोखंडी गजाने कुमार आणि गणेश या भावांना हात तसेच पाठीवर मारहाण केल्याने ते दोघे खाली कोसळले. त्यानंतर बालाजी पवार, निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर, मयूर जंगमवाड यांनी हात आणि लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. ते सर्वजण दुचाकीवरून निघून गेले. कुमार आणि गणेश जखमी अवस्थेत तेथेच पडून होते. काही वेळाने त्याठिकाणी सागर हिंगे, कालिदास झांबरे, विशाल झांबरे आले. त्यांनी या दोघांना दुचाकीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)