होरपळलेली मने वळिवामुळे टवटवीत

संग्रहित छायाचित्र...

तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित : वळिवामुळे प्रचार गेला वाहून

राजेंद्र वारघडे

पाबळ- शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षासह इतर बहुसंख्य उमेदवार निवडणूक लढवित असले तरी प्रचाराच्या फेऱ्या, मात्र थंडावल्याचे चित्र पुढे येत आहे. यासाठी कडक उन्हाळा हे कारण पुढे केले जायचे. आता वळीव पावसाने गारवा निर्माण केला आहे. तरीही निवडणुकांची रंगत कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर तालुक्‍यात वळिवाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यातून दुष्काळाच्या झळा कमी होत आहेत. त्यामुळे वळिवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची होरपळेली मने थोडीशी टवटवीत झाली आहे. त्यात “प्रचार गेला वाहून, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जनावरे, चारा, पाणी, रोजगारांची चिंता सतावत आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळाच्या झळा बसत असल्यामुळे निवडणुकांमधील “रस’ कमी झाला आहे. त्यामुळेच दुष्काळाचे दूरगामी परिणाम मतदानातून उतरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एका बाजूला खाईत लोटणारा दुष्काळ तर वळिवाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्वसामान्यांमधून यंदाच्या निवडणुकीबाबत “सन्नाटा’ निर्माण झाला आहे.

शिरूर तालुक्‍यातील बहुसंख्य गावांत नुकतीच वळिवाने हजेरी लावली. मागील वर्षी पावसाने तोंड न दाखवल्याने गंभीर झालेल्या परिस्थितीच्या चिंतेत शेतकरी असताना, निवडणुका जाहीर झाल्या. काही दिवस निवडणुकाच्या उमेदवारीचे, त्यानंतर प्रचाराचे, सभांचे, आश्‍वासनाच्या तुरळक सरी कोसळत गेल्या. थोडी मानसिकता वेडावली. इतक्‍यात वळिवाची अल्पकाळ गर्जना केली. त्यातून शेतकऱ्यांची करपलेली मने प्रफुल्लीत झाली.

निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची मांदियाळी असते. त्यात कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शन हे ठरलेले असते. काही नेतेमंडळी शेतकरी आणि नागरिकांच्या वर्मावर बोट ठेवतात. त्यानंतर दुखऱ्या जागेवर आश्‍वासनाची फुंकर घालण्यासाठी सर्वजण सरसावत असतात. मात्र, निवडणुका सरल्यानंतर नेत्यांना विसर पडतो. हेच लोकशाहीतील लोकांची मतांची किंमत झाकोळली जात आहे. शेतकऱ्यांच्या मरणकळा कमी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही.

शेतीमधील हंगाम संपल्यानंतर पारावच्या गप्पांना ऊत आलेला असतो. सकाळ आणि सायंकाळी प्रचाराची गाडी गावात आल्यानंतर निवडणुकांचा माहोल दिसतो. त्यानंतर गेल्यावेळी नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनाल उजाळा मिळतो. त्यातून चर्चेचा फड रंगवत तासन्‌तास गप्पा रंगल्या जातात. मात्र, शेवटी उत्तर एकच असते. एकाच माळेतील मणी.

 

  • शेतकरी भानावर
    स्वातंत्र्यानंतर लोकशाहीतील निवडणुकांमध्ये अभ्यासू वक्‍ते आपली बाजू मांडत होते. त्यानंतर काळ बदलत गेला. कोपरा सभा, पदयात्रा, सभा आदी संकल्पना आली. त्यातच डिजीटल आणि सोशल मीडियाचा पूरेपूर वापर होऊ लागला. आता हायटेक प्रचारातून आरोप- प्रत्यारोपाची राळ उठविली जात आहे. नैतिकता खुंटीला टांगली जात आहे.

खलफेक करून मतदारांची करमणूक सुरू आहे. गेल्या साठ वर्षांनंतर ही लोकशाही निवडणूक आता जाती- पातीच्या वळणावर पोहचली आहे. एकता, बंधूता, समता, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची चिरफाड करून मतदारांच्या गळी विषमतेची बीजे पेरली जात आहेत. त्यात तरूणाई वाहून जात आहे. प्रत्येक गटा- तटाचा विचार आता अडगळीला गेला आहे. जो कोणी राजकीय मैदानात जातो. त्यांच्याकडून समस्यापूर्तीसाठी आणाभाका घेतल्या जातात. पुन्हा पाच वर्षांनंतर त्यांचीच पुनरावृत्ती होते. हा सापशिडीचा खेळ मतदारांना गारूड्यासारखा खेळवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)