होय, एलईडी प्रकल्पात घोटाळा : सभागृहनेत्यांची कबुली

पण खापर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर

पुणे- एलईडी पथदिवे प्रकल्पात घोटाळा झाल्याची कबुली महापालिका सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र हा प्रस्ताव आमच्या सत्तेच्या काळात मंजूर झाला नव्हता, तर तो 2016 मध्ये मंजूर झाला होता; त्यावेळी आम्ही याला विरोध केल्याचे सांगत याचे खापर आधीच्या सत्ताधाऱ्यांवर फोडले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

-Ads-

एलईडी विषयात महापालिकेतील नगरसेवकांचे एकमत होत नव्हते. विरोधाचा सूरच जास्त होता. त्यामुळे हा प्रस्ताव न करण्याचा निर्णय तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. विरोध होणार याची कुणकुण लागल्याने तत्कालिन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थानिक सत्ताधऱ्यांना डावलून थेट मुख्यमंत्र्यांकडून हा प्रस्ताव मंजूर करून आणला. इतकेच नव्हे, तर पंतप्रधानांकडून स्वत:ची पाठही थोपटवून घेतली. अशाप्रकारे केलेल्या “स्मार्टवर्क’ मधून त्यांनी दिल्लीपर्यंत प्रमोशनची मजल मारली.

हा प्रकल्प राबविताना प्रशासकीय पातळीवर अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नाही तर एलईडीचे दिवे वापरल्याने विजेची बचत होणार असून, महापालिकेची आर्थिक बचत होईल, असा दावाही कुणाल कुमार यांनी केला होता. मात्र तो दावा किती खोटा आहे हे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर हा निर्णय आर्थिक नुकसान करणाराच ठरल्याचेही यावरून सिद्ध झाले आहे.

“स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या पहिल्या वर्धापनदिनाला आल्यानंतर पंतप्रधानांनीही या विषयाची तोंडभरून स्तुती केली मात्र हा घोटाळा बाहेर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही याबाबतचा खुलासा महापालिकेला मागितला आहे. त्यावर महापालिकेने पंतप्रधान कार्यालयाला खुलाशाचे पत्र पाठवले असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

संबंधितांवर आपण कारवाई करणार आहोत, असे भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु नेमके संबंधित कोण आणि कोणावर कारवाई करणार हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ज्यांनी या विषयासाठी आग्रह धरला ते कुणाल कुमार आता दिल्ली येथे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कशी कारवाई करणार, हे स्पष्ट करण्यात आले नाही. ज्या ठिकाणी अद्याप दिवे लावले नाहीत तेथे लावून घेणार असल्याचे भिमाले म्हणाले.

ज्या खांबांना आर्थिंग नाही, त्यांना आर्थिंग करण्याचे काम सुरू केले आहे. या संदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनाही सूचना दिल्या आहेत.
– मुक्‍ता टिळक, महापौर.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. नागरिक चेतना मंचने या बाबत सपटेंबर २०१७ मध्ये आपले सरकार वर तक्रार केली होती. तेव्हा आमची तक्रार दाबून टाकली
    .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)