होमिओपॅथीक डॉक्‍टरांचे प्रश्न सोडविणार

इंदापूर – राज्यातील सर्व चिकित्सापध्दतीच्या डॉक्‍टरांबद्दल आपणास आदर आहे. मात्र, होमिओपॅथीक डॉक्‍टर्स ग्रामीण, दुर्गम व आदीवासी भागात चांगली आरोग्य सेवा पुरवत आहेत. त्यामुळे रूग्णांना जीवदान मिळत आहे. राज्यातील 67 हजार होमिओपॅथीक डॉक्‍टरांपैकी सध्या 750 डॉक्‍टरांना ऍलोपॅथीचा औषधनिर्माणशास्त्र (फार्माकलॉजी) हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश मिळाला आहे. मात्र, ही संख्या वाढविणे गरजेचे आहे. तसेच त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावरील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी थेट आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याशी चर्चा करू, यासंदर्भात येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.
इंदापूर तालुका होमिओपॅथीक डॉक्‍टर संघटनेच्या डॉ. संदेश शहा, डॉ. बाळासाहेब खरे, डॉ. शशिकांत पोळ, डॉ. संदीप गार्डी, डॉ. आशिष दोभाडा, डॉ. मधुकर धापटे, डॉ. निलेश कुंभार, डॉ. रियाज पठाण या शिष्टमंडळाने भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार भरणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी भरणे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आमदार भरणे म्हणाले, लोकसंख्येच्या वाढत्या तुलनेत डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. राज्यात विविध होमिओपॅथीक महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले 67 हजार डॉक्‍टर शहरी व ग्रामीण भागात सेवा पुरवत आहेत. हे डॉक्‍टर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मोठमोठ्या रूग्णालयात काम करून मिळालेले ज्ञान व रूग्णालयातील अनुभवाच्या जोरावर ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्य आरोग्य विकासप्रवाहात आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागील सरकारने कायद्यात समयोचित बदल करत त्यांना ऍलोपॅथीच्या औषधशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. मात्र, त्यामध्ये 67 हजार डॉक्‍टरांपैकी फक्‍त 750 डॉक्‍टरांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. ही संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी डॉक्‍टरांच्या संख्येत देखील वस्तुनिष्ठ वाढ होणे गरजेचे आहे. तसेच या डॉक्‍टरांना ग्रामिण आरोग्यसेवेत सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी थेट मुंबई मंत्रालयात आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. तसेच वेळ पडली तर येत्या अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवला जाईल.
यावेळी डॉ. विलास चौगुले, डॉ. मधुकर राऊत, डॉ. संतोष शिंगाडे, डॉ. सचिन बाबर, डॉ. सतीश शिंगाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)