होमगार्डची वाहनचालकांवर ‘पोलीसगिरी’

वाहतूक नियमनाऐवजी दादागिरी, दंड वसूल 

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत नागरिकरनाच्या तुलनेत उपलब्ध असलेले मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यावर मात व्हावी आणि त्यामाध्यमातून वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्दात हेतूने ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड जवानांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांना वाहनचालकांचे कागदपत्र तपासण्याचे अथवा दंड आकारण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. हे वास्तव असतानाही भूगाव (ता.मुळशी) येथे होमगार्ड वाहनचालकांना दमदाटी करून त्यांच्याकडून पठाणी वसुली करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पुणे-पौड रस्त्यावरील भूगाव येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. मुळशीत विविध औद्योगिक कंपन्या आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी आणि कोकणात जाण्यासाठी या रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे नेहमीच येथे गर्दी असते. अशातच या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या 2-3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होमगार्डची नेमणूक केली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा, अशातच खड्डे चुकवित वाट काढत भूगाव गावातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. आधीच या वाहतूक कोंडीला प्रवासी कंटाळलेला असतो. अशा परिस्थितीत या होमगार्डकडून प्रवाशांची अडवणूक केली जाते. तसेच, वाहनचालकांकडे वाहन परवाना मागणे, टेम्पो व इतर वाहनचालकांकडून विम्याची कागदपत्रे, पीयुसी परवानी अशी कागदपत्रे मागितली जातात. दुचाकीस्वारांच्या गाडीची चावी काढून घेणे. तरूण-तरुणींशी वाद घालणे, महिलांना अडविणे असे प्रकारही घडतात. या होमगार्डकडून होणाऱ्या त्रासाची कैफियत काही नागरिकांनी “प्रभात’कडे मांडली. वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी होमगार्डकडून प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या होमगार्डांवर कारवाईची मागणी होत आहे.

होमगार्ड यांचा ड्रेस पोलिसांसारखाच असतो. त्यात त्यांच्याकडून शर्टवर जॅकेट घातले जाते. यामुळे ते पोलीस आहेत, असा भास नागरिकांना होतो. हे होमगार्ड आवाज वाढवून प्रवाशांशी बोलतात. तसेच, दबाब टाकण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे सुरुवातीस प्रवाशांना हे पोलीसच असल्याचे वाटतात. त्यामुळे प्रवाशांकडून ओळखपत्राची मागणी होत नाही. या होमगार्डंना काही उलट प्रश्‍न विचारले तर ते आणखी त्रास देतील या हेतूने प्रवासी वाद घालत नाहीत. वाहन परवाना नसेल किंवा अन्य काही कागदपत्रे नसेल तर या होमगार्डंकडून पैशांची मागणी होते. त्यांना चिरीमिरी देऊन प्रवासी आपली सोडवणूक करून घेतात. या परिसरात महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात. त्यांना सर्रास होमगार्डकडून लुटण्याचे प्रकार घडतात. तरुण-तरुणी घाबरुन त्यांना पैसे देऊन तेथून निघून जातात.

होमगार्डच्या गैरकृत्याला पोलिसांची साथ ?
होमगार्ड प्रवाशांची अडवणूक तसेच त्यांच्या वाहनांच्या चाव्या काढून घेत असताना उपस्थित पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात. रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी लावून यामध्ये पोलीस बसलेले असतात. या वाहनाच्या पुढील काचेवर पोलीस असा फलक लावलेला असतो. होमगार्डने वाहनचालकाला पकडले की, या वाहनचालकाने गाडीत बसलेल्या पोलिसांची भेट घ्यावी लागते. पोलीस गाडीतून खाली सुध्दा उतरण्याची तसदी घेत नाहीत. या ठिकाणी “तोडपाणी’ होऊन विषय मिटविला जातो. अशा प्रकारे होमगार्ड गिऱ्हाईक शोधून पोलिसांकडे पाठविण्याचे काम करताना दिसतात. त्यामुळे या होमगार्डच्या गैरकृत्याला पोलिसांची साथ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

होमगार्डला पावत्या फाडून दंड आकारण्याचे अधिकार नाहीत. त्यांची नेमणूक वाहतूक नियमनासाठी करण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत ते कारवाई करून शकतात, मात्र पावती फाडण्याचा अधिकार फक्त पोलिसांनाच आहे. होमगार्डकडून जर नागरिकांची विनाकारण अडवणूक होत असेल तर तो चुकीचा प्रकार आहे. नागरिक याची तक्रार थेट पोलीस नियंत्रण कक्ष, संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात करू शकतात. तक्रार आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

– गणपतराव माडगुळकर, पोलीस उपअधीक्षक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)