होमगार्डची नोकरी, नको रे बाबा!

भरतीमध्ये निम्म्याने घट : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही अवस्था

पुणे – दोन ते तीन वर्षे गणवेश नाही, हातातील काठी पुरती मोडकळीला आलेली आणि मानधनाचे तर काय विचारुच नका, अशी अवस्था आहे. राज्यभरातील तब्बल 40 हजार होमगार्डच्या जवानांची. धक्कादायक बाब म्हणजे तीन-तीन महिने बंदोबस्ताचे कामही मिळत नाही. मात्र, हे वास्तव असले तरीही वर्षातून 50 टक्के हजेरी, उजळणी प्रशिक्षण या बाबींमध्ये कमतरता जाणवली की वरिष्ठांनी घरचा रस्ता दाखवलाच म्हणून समजा. त्यामुळे शेतात औत धरलेला बरा; पण होमगार्डची नोकरी नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ कधीकाळी या नोकरीसाठी आटापिटा करणाऱ्या तरुणांवर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सर्व कटकटींमुळेच गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत होमगार्डच्या भरतीमध्ये तब्बल 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील तरुण तर या भरतीकडे फिरकतही नाही, त्यामुळे सर्वसामान्यांचे रक्षक आणि पोलिसांचा उजवा हात समजले जाणारे हे दलच समस्यांच्या गर्तेत अडकले आहे.

पोलिसांच्या प्रमाणेच राज्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्याची आणि समाजाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होमगार्डच्या जवानांवर आहे. त्यामुळेच राज्य शासन आणि विशेषत: गृह विभागाने या दलाला विशेष असा दर्जा दिला आहे. मात्र, या दलाला विशेष दर्जा दिला असला तरी त्यांना सुविधा पुरविण्यास राज्य शासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. हे जवान आपत्ती, सणासुदीचा काळ, नेत्यांचे बंदोबस्त अथवा दंगलीच्या प्रसंगी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. तरी, राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने त्यांना अद्यापही अपेक्षित सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.

वास्तविक दंगल, सणासुदीचा बंदोबस्त अथवा आपत्तीच्या प्रसंगी हातातील काठी हेच त्यांचे महत्त्वाचे हत्यार आणि आधार समजला जातो. मात्र, त्यांना साध्या काठ्या पुरविण्याचे औदार्यही राज्य शासन अथवा गृह विभागाच्या वतीने दाखविण्यात येत नाही. हे वास्तव असतानाही हा जवान केवळ स्वत:च्या हिमतीवर गेल्या काही वर्षांपासून समाजाचे रक्षण करत आहे. होमगार्डच्या जवानांना किमान दोन वर्षातून दोन गणवेश आणि टोप्या दिल्याच पाहिजेत, असा सर्वसामान्य नियम आहे. मात्र, या जवानांना पाच-पाच वर्षे गणवेशच मिळत नाही ही त्यांची शोकांतिका आहे.

हे गणवेश मिळावेत यासाठी दररोज हजारो अर्ज होमगार्डच्या मुख्य कार्यालयात धडकत आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने खास तरतुदही करण्यात आली आहे. हे वास्तव असतानाही प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे आपलेच पैसे आणि आपलाच गणवेश असा सण साजरा करण्याची वेळ होमगार्डच्या सर्वसामान्य जवानांवर आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे आणि राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे होमगार्डच्या भरतीवरही गेल्या काही वर्षांच्या कालावधीत संक्रात आली आहे.

यापूर्वी होमगार्डची भरती म्हटले की, तरुणांची भली मोठी रांगच लागायची. मात्र, या सर्व बाबींमुळे या भरतीलाच ओहोटी लागली आहे. शाश्‍वती नसणारी नोकरी, बंदोबस्तानंतर तीन ते चार महिन्यांनी मिळणारे मानधन आणि सुविधांचा अभाव यामुळे होमगार्ड दलाकडे पाहाण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच बदलला आहे. त्यामुळे या दलाला सावरण्यासाठी आता शासनकर्त्यांनाच प्रयत्न करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)