“हॉटेल वेस्ट टू बायोगॅस’ला “बुरे दिन’

– महापालिकेचा पर्यावरण विभाग हतबल

पिंपरी – सर्वसामान्य नागरिकांना “अच्छे दिन’ येणार अशा आणाभाका घेवून महापालिकेत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या काळात महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छ भारत मिशन’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या “हॉटेल वेस्ट टू बायोगॅस’ हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्‍यता आहे. कारण, संबंधित प्रकल्पाचे काम घेतलेल्या ठेकेदाराने काम पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात निर्माण होणा-या सुमारे 50 मेट्रिक टन हॉटेल वेस्टपासून “पीपीपी’ तत्त्वावर (बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा) बायोगॅस प्रकल्प राबविण्यात नियोजन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. मात्र, हे काम घेणारा ठेकेदार असमर्थता दर्शवित असल्याने “हॉटेल वेस्ट टू बायोगॅस’ हा प्रकल्प बारगळणार आहे. वारंवार नोटिसा देऊनही ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने या प्रकल्पासाठी पुन्हा निविदाप्रक्रिया राबविण्याचा विचार पालिकेचा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक दिवशी 800 मेट्रीक टन ओला व सुका कचरा मोशी कचरा डेपोमध्ये टाकला जातो. या कच-यापैंकी सुमारे 50 मेट्रिक टन कचरा हा हॉटेल वेस्ट आहे. हॉटेलमधून येणारा सगळा कचरा ओलाच असतो. मात्र, हा 50 मेट्रीक टन कचरा मोशीतील कचरा डेपोमध्ये जातो. तेथे इतर कच-यामध्ये तो मिसळला जातो. त्यामुळे कच-याची विल्हेवाट लावताना ब-याच अडचणी येतात. त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. त्यासाठी हॉटेल वेस्टची विल्हेवाट स्वतंत्ररित्या लावण्यासाठी पर्यावरण विभागाने बायगॅस प्रकल्पाचे नियोजन केले होते.

त्यानुसार 20 वर्षांसाठी पीपीपी तत्वावर हा प्रकल्प राबविण्याचे ठरले. या प्रकल्पाचे काम करण्याची तयारी मे. नोबल एक्‍सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युश्‍स प्रा. लि. या एकाच ठेकेदार कंपनीने दर्शविली होती. कंपनीला बायोगॅस निर्मितीसाठी पालिका पैसे देणार नव्हती. या प्रकल्पासाठी शहरातील सर्व हॉटेलमधून कचरा संकलन ठेकेदार कंपनीकडून केले जाणार होते. त्याकरिता प्रति टन 1125 रुपये दर व त्यात प्रतिवर्षी 5 टक्के वाढ देण्याचे निश्‍चित झाले होते. तसेच, गोळा केलेले हॉटेल वेस्ट मोशी येथे एकत्रित करण्यासाठी जागा पालिका उपलब्ध करून देणार होती. तेथे हॉटेल वेस्टचे पॅकींग करून ते तळेगाव एमआयडीसीतील प्रकल्पावर नेले जाणार होते.

करारनाम्याप्रमाणे पैसे भरले नाही
दरम्यान, या प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीने 26 जुलै 2017 रोजी मंजूर केला. तत्पुर्वी ठेकेदार कंपनीच्या तळेगाव एमआयडीसीमधील बायोगॅस प्रकल्पाची पालिका आयुक्तासह अधिकारी व तत्कालीन स्थायी समितीने पाहणी केली होती. नंतर 1 मार्च 2018 रोजी ठेकेदारासोबत करारनामा करण्यात आला, परंतु अद्याप कामाचे आदेश दिलेले नाहीत. कारण, ठेकेदार करारनाम्याप्रमाणे पालिकेकडे 50 लाख रुपये भरत नाही. आर्थिक अडचणीमुळे ठेकेदार काम करण्यास असमर्थता दर्शवित आहे, अशी माहिती संबंधित विभागाचे अधिकारी देत आहेत.

महापालिकेकडे 50 लाख रुपये जमा करत नसल्याने, तसेच काम सुरू न केल्यामुळे संबधित ठेकेदाराला महापालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तीन नोटिसा बजाविल्या असून 15 जून 2018 रोजी अंतिम नोटीस दिली होती. त्यात 31 जुलैपर्यंत मुदत ठेकेदाराने मागितली होती. ही मुदत आता संपुष्टात आली असून, महापालिका या प्रकल्पासाठी फेरनिविदा राबविणार आहे.
– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)