हॉटेल चालकाची पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

पुणे,दि.27- लष्कर परिसरातील एका हॉटेल चालकाने चौकीमध्येच पोलीस उपनिरीक्षकास मारहाण करुन इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एका तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आल्यावर आरोपीला मोबाईलवर व्हिडीओ शुटींग करण्यास नकार दिल्याने त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी त्याच्यासह इतर दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरज राजेंद्र जैन, आकाश अशोक बन्सल आणी अशोक बन्सल अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजमलखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अजमलखान पठाण हे कौन्सील हॉल चौकीत कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोपी निरज जैन यांच्याविरुध्द फसवणूकीचा एक तक्रार अर्ज आला होता. त्याने एका अनिवासी भारतीयाची 55 लाखाची फसवणूक केली होती. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने निरजला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तो येताना सोबत सासरे अशोक बन्सल व मेव्हणा आकाश बन्सल यांना घेऊन आला होता. यावेळी चौकशी सुरु असताना त्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करण्यास सुरवात केली. त्याला पठाण व्हिडीओ शुटींग करता येणार नाही, तुम्ही कायद्याचा भंग करत आहात असे समजावून सांगितले. त्याला व्हिडीओ शुटींग थांबविण्यास सांगितल्याने त्याने रागाच्या भरात पठाण यांना मारहाण केली. यावेळी तेथे उपस्थित महिला पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या मदतीला आली असता तीलाही शिवीगाळ करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरज जैन याचे लष्कर परिसरात डोलची नावाचे मोठे हॉटेल आहे. या हॉटेलसाठी त्याने काही लोकांकडून पैसे घेतले आहेत. एका अनिवासी भारतीयाकडूनही त्याने जादा परताव्याचे आमिष दाखवून 55 लाख रुपये घेतले आहेत. मात्र हे पैसे परत न केल्याने त्याच्याविरुद्द संबंधीत व्यक्तीने तक्रार अर्ज दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here