हॉटेल चालकाकडे मागीतली 10 लाखाची खंडणी

मुंबई क्राईम ब्रॅंचचा अधिकारी असल्याचे सांगत गुन्हयात अडकवण्याची धमकी
पुणे,दि.26-मुंबई क्राईम ब्रॅंचचा अधिकारी बोलतोय, पिस्तूल खरेदी करताना एकाला पकडले आहे, त्याने तुमच्यसाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. तुम्ही जर तातडीने 10 लाख रुपये दिले नाही तर तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन मिडीयातून बदनामी करेल. याप्रकारे
्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌पुण्यातील एका प्रसिध्द हॉटेल मालकास धमकावण्यात आले. याप्रकरणी एका अज्ञात मोबाईलधारका विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल वामन भिडे(55,रा.जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावर पांचाली नावाचे हॉटेल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली.
यासंदर्भात सविस्तर असे की, फिर्यादीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने मुंबई क्राईम ब्रॅंचचा अधिकारी असल्याचे सांगितले. मुंबई येथे एका व्यक्तीला पिस्तूल खरेदी करताना पकडले आहे. त्याने तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तर तातडीने सेटलमेंट करा. तुम्ही 10 लाख रुपये दिल्यास गुन्हा दाखल करणार नाही. अन्यथा मोठा गुन्हा दाखल करुन मिडीयात बदनामी करण्यात येईल असे धमकावले होते. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करत आहेत.

... गुन्हे करण्याची नवी मोडस
मुंबई क्राईम ब्रॅंचचा अधिकारी असल्याचे सांगत गुन्हे करण्याची नवी मोडस उदयाला आली आहे. यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारालाही फसवले जात आहे. गुन्हा करणारा ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहातो याची प्रथम माहिती करुन घेतो. संबंधीत पोलीस ठाण्यात कॉल करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव विचारुन घेतो. यानंतर रात्री बारा ते पहाटे चार दरम्यानच संबंधीत पोलीस ठाण्यात कॉल करुन, ठाणे अंमलदाराला तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलण झाल्याचे भासवले जाते. ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, त्याला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यास सांगितले जाते. इतक्‍या रात्री पोलिसांनी बोलावले असल्याचे लक्षात येताच संबंधीत व्यक्ती घाबरुन गेलेला असतो. हा व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच, त्याच्या मोबाईलवर कॉल करुन सेटलमेंटसाठी दबाव टाकला जातो. संबंधीत व्यक्ती सेटलेमेंटला तयार झाल्यास त्याला मुंबईला पैसे घेऊन बोलावले जाते.
याप्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत घडला होता. त्यालाही अशाचप्रकारे धमकावून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. मात्र संबंधीत पेट्रोल पंप चालकाने तक्रार दाखल केली नाही. या गुन्हयातही तीच मोडस असल्याचे लक्षात येताच ठाणे अंमलदाराणे भिडे यांना पोलीस ठाण्यात बोलावले नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन तक्रार दाखल केली. गुन्हे करणारा खुपच हुशार असून तो रात्री बारा ते पहाटे चारच्या सुमारासच पोलीस ठाण्यात फोन करतो. यावेळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नसतात. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलणे झाल्याचे सांगत तो ठाणे अंमलदाराला खोटे सांगतो. ठाणे अंमलदारही इतक्‍या रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून फोन करत नाही. ते आरोपीच्या सांगण्यानूसार संबधीत व्यक्तीस पोलीस ठाण्यात बोलावून पहाटेपर्यंत थांबवून घेतात. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकारे फसवणूकीच्या घटना लक्षात घेता, ठाणे अंमलदारांना निर्देश देण्यात आले आहेत की संबंधीत अधिकाऱ्याने पत्र दिल्याशिवाय किंवा त्याने पथक पाठवल्याशिवाय कोणाही व्यक्तीस पोलीस ठाण्यात बोलावून घेऊ नये – (पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)