हॉटेलसाठी माहीचे अपहरण

पिंपरी – हॉटेल सुरू करण्यासाठी माहीचे अपहरण करणाऱ्या आरोपींनी श्रीमंत घरच्या मुलांना “टार्गेट’ केले होते. त्यासाठी अनेक सोसायट्यांची त्यांनी “रेकी’ केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

माही अवध जैन (वय-12) हिचे अपहरण झाले होते. चित्रपटातील एखाद्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीने पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केले. नितीन सत्यवान गजरमल (वय-25, रा. नेरे. मूळ रा. देवगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय-21, रा. थेरगाव, वाकड) या आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हॉटेल टाकण्यासाठी त्यांनी माहीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे.

दोन्ही आरोपी अशिक्षीत आहेत. ते दोघेही एका चित्रपटगृहात कामगार म्हणून काम करत होते. दोघांनीही नोकरी सोडून स्वतःचे हॉटेल टाकण्याचे ठरवले. मात्र त्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. यावेळी त्यांनी एका श्रीमंत घरच्या मुलाचे अपहरण करुन पैसा कमवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी शहरातील अनेक सोसायटींची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन 44 हजारांची एक कार विकत घेतली. मारुंजी येथे एक्‍सर्बीया प्रोजेक्‍ट येथे ऑनलाइन पद्धतीनेच एक फ्लॅट भाड्याने घेतला. या साऱ्या तयारीनंतर त्यांनी चिंचवड येथील क्विन्स टाऊन सोसायटी फिक्‍स केली. तेथे गेल्या आठ दिवसांपासून ते पाळत ठेऊन होते. शेवटी त्यांनी माहीचे तिच्याच सोसायटी समोरून भर दिवसा अपहरण केले.

आरोपींनी माहीला बेडशीटमध्ये गुंडाळून तोंडाला पट्टी लावून कारमधून मारुंजी येथील एक्‍सर्बीया सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये नेले. यतेथे तिला त्यांनी डांबून ठेवले. आरोपींने माही कडूनच तिच्या वडिलांचा नंबर घेतला व त्या क्रमांकावर फोन केला व 50 लाखांची खंडणी मागितली. यावेळी पोलिसांनी फोनचे लोकेशन “ट्रेस’ केले व त्यानुसार तपास केला मात्र त्यातील एक आरोपी हा फोनवर बाहेर येवून बोलत असल्यामुळे पोलिसांना दोन लोकेशन मिळत होते. यासाठी पोलिसांनी तांत्रीक बाबीसाठी एक पथक व घटनास्थळावर इतर पथके अशी पथकांची विभागणी केली होती.

शेवटी घटनास्थळाचे लोकेशन मिळाल. मात्र प्रोजेक्‍टमध्ये 25 इमारती होत्या त्यातील कोणत्या फ्लॅटमध्ये आरोपी होते हे शोधणे कठीण होते. यावेळी पोलिसांनी आरोपींना पैसे घेण्यासाठी जवळच असणाऱ्या डी. वाय पाटील महाविद्यालया जवळ बोलावले व काही लोक हे एक्‍सर्बीयाच्या गेटवर थांबले. यावेळी सोसायटीतील एका महिलेने पोलिसांजवळ येत एका फ्लॅटमधून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपींशी चर्चा करुन आरोपीला बिल्डींगच्या खाली बोलावले. तर दुसऱ्या पथकाने एका आरोपीला पकडले तर एक जण खोलीचा दरवाजा बंद करुन आतच बसला होता तो बाहेर येण्यास तयार नव्हता. शेवटी दरवाजा तोडून त्याला जेरबंद करण्यात आले. रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी माहीला सुखरूप बाहेर काढले.

माहीने राखले प्रसंगावधान
माहीला अपहरणकर्त्यांनी आईस्क्रीम खायला देऊ केले. मात्र माहीने यातून आपल्याला बेशुद्ध केले जाऊ शकते हे जाणून ते खाण्यास नकार दिला. तसेच तिला तिच्या वडिलांचा पगार विचारला असता तेही कमी सांगितला. ज्यामुळे आरोपींना खंडणी मागताना गोंधळ उडाला. पोलिसांनी माहीची सुटका केली तेव्हा साध्या वेशात असलेल्या पोलिसांजवळ जाऊन तिने आधी खात्री केली व थेट अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांच्याकडे भूक लागली असल्याचे सांगितले. रानडे यांनीही तातडीने तिला बिस्कीट व पाणी देऊ केले. माहीने दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल आयुक्‍त पद्‌मनाभन यांनी तिचे विशेष कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)