हॉकिंगविषयी न लिहिलं गेलेलं बरंच काही…

   विज्ञानविश्‍व

   मेघश्री दळवी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट आणि वैयक्‍तिक पातळीवर साक्षात्कार झाल्यावर “बुद्धिमत्ता म्हणजे बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता’ ही हॉकिंग यांची व्याख्या अगदी आतून आलेली होती. स्वत: शिकण्याची क्षमता असणारी आजची कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली आणखी कुठे वेगळी असते? मात्र, त्याच वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात माणसाला धोकादायक ठरेल यावर त्यांचा दृढ विश्‍वास होता. या विषयावर हॉकिंग नेहमी आपलं मत व्यक्‍त करत असत.

या शतकातले सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात प्रेरणादायी शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग नावाचा “थिअरी ऑफ एव्हरीथिंग’चा ध्यास घेतलेला तेजस्वी तारा आता आपल्यात नाही. स्टीव्हन हॉकिंग म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतं ते “अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’. विश्‍वाच्या जन्मापासून म्हणजे बिग बॅंगपासून ते थेट ब्लॅक होलपर्यंतचे सिद्धान्त अगदी थोडक्‍यात आणि सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपात मांडणे हे काही सोपं काम नाही. पण हॉकिंग यांनी या अवघ्या 225 पानांमध्ये काल, अवकाश, गुरुत्वाकर्षण, सापेक्षता सिद्धान्त, पुंज भौतिकी, समांतर विश्‍व आणि इतर कितीतरी गोष्टींचा विश्‍वाचा पसारा अत्यंत रंजकतेने मांडून दाखवला आहे. या बेस्टसेलर पुस्तकाचा कोटीच्यावर प्रतींमध्ये खप आणि 35 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. अर्थात हे फक्‍त एखाद्या असामान्य शास्त्रज्ञालाच शक्‍य आहे आणि ते होतेही तसेच असामान्य आणि झुंजार.

वयाची विशी जेमतेम पार केलेली असताना हॉकिंगना मोटर न्यूरॉन रोगाने ग्रासलं. पदवी हातात होती, पुढे संशोधनाचं जग खुणावत होतं, पण शरीर साथ देत नव्हतं. हळूहळू बोलणं अडखळायला लागलं, लिहिता येईना, चालणं कठीण व्हायला लागलं. अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून आलं तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं माणसाच्या आयुष्यात काय स्थान आहे याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. “इक्वलायझर’ या संगणक प्रणालीच्या सहाय्याने एक स्विच वापरून ते बोलू लागले. पुढे हाताचा वापर जमेना तेव्हा गालाचा स्नायूने ते स्वीच सुरू करू लागले. तेही मग जमेनासं झालं तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा आधार त्यांना मिळाला. त्यांच्यासाठी खास व्हीलचेअरही तयार झाली.

हॉकिंग यांचा आणखी आवडता विषय म्हणजे एलियन्स अर्थात परग्रहवासी. “अंतराळात संदेश पाठवून एलियन्सना आमंत्रण देणं, म्हणजे शुद्ध मूर्खपणा,’ असं त्यांचं ठाम मत होतं. “एलियन्स येतील, ते आपल्याला नष्ट करून टाकायलाच, तेव्हा एलियन्सना पाठवलेल्या संदेशाच्या उत्तराची वाट कशाला बघता,’ असा त्यांचा सवाल असायचा.
अवकाशाचा सैद्धांतिक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचं नेहमी एक स्वप्न असतं – प्रत्यक्ष अवकाशप्रवास करण्याचं. स्टीव्हन हॉकिंगही त्याला अपवाद नव्हते. त्यांनी 2007 साली नासाच्या शून्य गुरुत्वाकर्षण विमानोड्डाणाचा अनुभव घेतला. जवळजवळ 45 वर्षे व्हीलचेअरला जखडल्यावर पहिल्यांदाच मोकळेपणाने तरंगण्याचा अनुभव त्यांच्यासाठी लाखमोलाचा होता. सुपरमॅन वाटण्याचा होता. (छायाचित्र पहा.) त्यानंतर त्यांची आकांक्षा होती अंतराळात सैर करायची. “व्हर्जिन गॅलॅक्‍टिक’ या खासगी कंपनीने भविष्यातल्या आपल्या पहिल्या अवकाशप्रवासात हॉकिंगना मानाचं स्थान देऊ केलं होतं. मात्र, त्यांची ती इच्छा अपुरीच राहिली.

आपल्या शारीरिक अडचणीवर मात करताना हॉकिंगना साथ मिळाली ती त्यांच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीची. आपली व्हीलचेअर ते एकदम स्टाइलमध्ये आणि वेगाने चालवायचे. केंब्रिजच्या विद्यार्थ्यांना त्यांची भरधाव व्हीलचेअर आणि व्हीलचेअर डान्स चांगलेच परिचयाचे होते. “जॉन ऑलिव्हर टॉक शो’मध्ये जॉन गमतीने म्हणाला की, “असं एखादं समांतर विश्‍व असेल, जिथे मी तुमच्यापेक्षा बुद्धिमान असेन.’ त्यावर हॉकिंगनी तत्काळ उत्तर दिलं की, “असंही एखादं समांतर विश्‍व असेल, जिथे तू जरा मजेदार बोलत असशील!’ “वन डायरेक्‍शन’ या म्युझिक बॅंडमधून झेन मलिक बाहेर पडला तेव्हा, “कोणत्यातरी समांतर विश्‍वात तो अजूनही “वन डायरेक्‍शन’मध्ये असेल,’ असा दिलासा त्यांनी त्या बॅंडच्या चाहत्यांना दिला होता. विज्ञानाला रोजच्या आयुष्याशी जोडून घेण्याची ही त्यांची विशेष हातोटी होती.

हॉकिंग यांच्या बोलण्याच्या संगणक प्रणालीला आवाज देण्यासाठी त्यांनी एकदा एक स्पर्धा आयोजित केली. त्यात अनेक नामवंत अभिनेत्यांनी हौसेने भाग घेतला. आणि हॉकिंगनी शेवटी निवड केली ती मायकेल केनची. असं काही ना काही त्यांचं नेहमी चालायचं. “लाइफ इज ट्रॅजिक; इफ नॉट फनी’, हे त्यांचं आवडतं वाक्‍य! “विज्ञान जितकं गंभीर असतं तितकंच ते थ्रिलिंग असतं, गमतीचं असतं,’ असं हॉकिंगना नेहमी वाटायचं. बरोबरीच्या अनेक शास्त्रज्ञांशी ते जाहीर वाद करायचे आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचे. “हिग्ज बोसॉन’ कणांचा सिद्धान्त प्रा. हिग्ज यांनी मांडला, तेव्हा गॉर्डन केन या शास्त्रज्ञाबरोबर हॉकिंगनी जाहीर पैज लावली होती – “असे कण अस्तित्वात नसतील’ म्हणून. मात्र सर्न प्रयोगशाळेत “हिग्ज बोसॉन’ कण खरोखरीच सापडल्यावर प्रा. हिग्ज यांना 2013 मध्ये नोबेल पारितोषिक घोषित झालं आणि “या नोबेलपायी माझे पैजेचे शंभर डॉलर्स गेले!’ असे मजेदार उद्‌गार हॉकिंगनी काढले. आधी कॅलटेकच्या जॉन प्रेस्किलबरोबरची ब्लॅक होलसंबंधी पैजही ते हरले होते. पण हे सगळं करत राहताना त्यांना अपरिमित आनंद मिळायचा आणि तो ते प्रसन्नपणे व्यक्‍तही करायचे.

या सगळ्यामुळे हॉकिंगना एक सेलेब्रिटी स्टेटस आलं होतं आणि पॉप कल्चरमध्ये ते अनेकदा दिसायचे. “स्टार ट्रेक-द नेक्‍स्ट जनरेशन’ आणि “द बिग बॅंग थिअरी’ या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी चक्क स्वत: हजेरी लावली होती. तर “सिम्पसन्स आणि फ्युचरामा’ या ऍनिमेशन मालिकांमध्ये त्यांचं पात्र मजा करून गेलं होतं. “लिटल ब्रिटन’मध्येही ते चमकून गेले होते. केवळ एका विषयाला वाहून न घेता त्यांची मती अनेक विषयांमध्ये लीलया संचार करत असे. लांबुटक्‍या आकाराची “ओउमुआमुआ’ नावाची अशनी सूर्यमालेच्या बाहेरून जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा आली तेव्हा तिचा अभ्यास करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता.

गणित विषयातलं त्यांचं सुरुवातीपासून योगदान वादातीत आहे. अलीकडे त्यांनी रोबॉट्‌सबाबत संशोधनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. गॅलिलिओ, न्यूटन, आइनस्टाइन या दिग्गजांनी त्यांचा काळ कसा गाजवला असेल, विज्ञानाला नवी दिशा देताना इतिहास कसा घडवला असेल, तो थरार, ते रोमांचक दिवस काय असतील याची पूर्ण कल्पना हॉकिंग यांच्यावरून येते. कधी ब्लॅक होलसंबंधी त्यांची थिअरी समजून घेताना, कधी “टाइम ट्रॅवल’विषयी त्यांचे सहकारी शास्त्रज्ञांशी वादविवाद पाहताना आणि अलीकडे बुद्धिमान रोबॉट्‌सविषयी त्यांची मतं जाणून घेताना त्यांच्या बहुआयामी, प्रतिभावंत, प्रखर बुद्धिमत्तेच्या व्यक्‍तिमत्वाने आपण पुरेपूर भारावून जातो. विज्ञानाच्या दृष्टीने योगायोग म्हणजे फक्‍त एक शक्‍यता असते. केवळ एक गणिती संख्या. पण गॅलिलिओच्या पुण्यतिथीला जन्मलेला हा थोर शास्त्रज्ञ आइनस्टाइनच्या जन्मदिनी आपल्यातून जाणे हा योगायोग काहीतरी विलक्षण खरा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील लेख वाचण्यात आला हॉकिंग्स सारखी व्यक्ती जर भारतात जन्माला आली असती व त्यांना वरील प्रकारचा रोग जडला नासता तर त्यांच्या एकूण विचार करण्याची पद्धत विचारात घेता आपल्या संत शात्रज्ञानी समस्त विश्वाबाबत जे सिद्धांत मांडले आहेत ते आजच्या आधुनिक तन्त्रद्न्यानाच्या साहायाने 100% खरे असल्याचे सप्रमाण सिद्ध केले असते आज त्यांच्या बाबत लिहले गेलेले व न लिहले गेलेले पुढेही प्रकाशित होईल परंतु त्यांच्या बॊधिक विचारांची हि दुसरी बाजू नेहमीसाठीच अंधारात राहील कारण आज ते आपल्यात नसल्यानेच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)