हैदराबादचा स्वप्नभंग करून कोलकाताची आगेकूच

बंगळुरू, दि. 18- कर्णधार गौतम गंभीरची समयोचित संयमी खेळी आणि ईशांक जग्गीच्या साथीत त्याने केलेल्या अखंडित झुंजार
भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल-10 क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटर लढतीत सनरायजर्स हैदराबाद संघाचा 7 गडी व 4 चेंडू राखून पराभव करता आला. या विजयामुळे कोलकाता संघाने उद्या, शुक्रवारी होणाऱ्या क्‍वालिफायर-2 लढतीत प्रवेश मिळविला आहे. या लढतीत त्यांच्यासमोर काल क्‍वालिफायर-1 लढतीत पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान राहील. तर पराभूत झालेल्या गतविजेत्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
त्याआधी पावसाचे सावट असलेल्या या लढतीत दोन वेळच्या माजी विजेत्या कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायजर्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत आपल्या कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरची झुंजार खेळी आणि केन विल्यमसनच्या साथीत त्याने केलेल्या बहुमोल भागीदारीनंतरही गतविजेत्या हैदराबाद संघाचा डाव 20 षटकांत 7 बाद 128 धावांवर रोखताना आपल्या संघाला वर्चस्व मिळवून दिले.
त्यानंतर उपाहाराला आलेल्या पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. सुमारे तीन तासांनंतर पाऊस थांबल्यावर पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी करून मध्यरात्री 1.00 वाजता सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोलकाता संघाला विजयासाठी 6 षटकांत 48 धावांचे सुधारित लक्ष्य दिले. या 6 षटकांत 2 षटकांच्या पॉवर-प्लेचाही समावेश होता. कोलकाता संघाने 5.2 षटकांत 3 बाद 48 धावा करून विजयाची पूर्तता करीत क्‍वालिफायर-2 लढतीत स्थान मिळविले.
विजयासाठी केवळ 48 धावांच्या आव्हानासमोर तिसऱ्याच चेंडूवर ख्रिस लिन (6) भुवनेश्‍वरच्या गोलंदाजीवर बाद जाला. तसेच युसूफ पठाण पुढच्याच चेंडूवर धावबाद झाला, तर दोन चेंडूंनंतर जॉर्डनने रॉबिन उथप्पाला बाद करीत कोलकाताची 3 बाद 12 अशी अवस्था केली. परंतु गौतम गंभीरने कर्णधाराला साजेशी खेळी करीत ईशांक जग्गीच्या (नाबाद 5) साथीत कोलकाताचा विजय साकार केला. गंभीरने 19 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 32 धावा फटकावल्या. एकेक बळी घेणाऱ्या भुवनेश्‍वर आणि जॉर्डन यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
तत्पूर्वी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा हैदराबादचा सलामीवीर शिखर धवन आज अपयशी ठरला. त्याने केवळ 11 धावा करताना डेव्हिड वॉर्नरच्या साथीत हैदराबादला 4.2 षटकांत 25 धावांची सलामी दिली. डेव्हिड वॉर्नरने केन विल्यमसनच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 7.4 षटकांत 50 धावांची भागीदारी करीत हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 26 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 24 धावांची खेळी करणाऱ्या विल्यमसनपाठोपाठ दोनच चेंडूंनंतर वॉर्नरही परतल्याने हैदराबादची 3 बाद 75 अशी अवस्था झाली.
विजय शंकरने 17 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 22 धावांची खेळी करताना युवराजसह 24 धावांची आणि नमन ओझाच्या साथीत 19 धावांची भर घालताना हैदराबादला किमान सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. युवराजला केवळ 9 धाव करता आल्या, तर ओझाने 16 धावांची खेळी केली. कूल्टर नाईलने विजय शंकर आणि ख्रिस जॉर्डन यांना एकाच षटकात बाद करून हैदराबादची आगेकूच रोखली. कोलकाताकडून नॅथन कूल्टर नाईलने 20 धावांत 3, तर उमेश यादवने 21 धावांत 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक-
सनरायजर्स हैदराबाद- 20 षटकांत 7 बाद 128
(डेव्हिड वॉर्नर 37, केन विल्यमसन 24, विजय शंकर 22, कूल्टर नाईल 20-3, उमेश यादव 21-2)
पराभूत विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स- (सुधारित लक्ष्य 6 षटकांत 48 धावा)
5.2 षटकांत 3 बाद 48 (गौतम गंभीर नाबाद 32, भुवनेश्‍वर कुमार 11-1, ख्रिस जॉर्डन 9-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)