‘हे’ आहेत दीर्घश्वसनाचे फायदे (भाग १)

डॉ. भारत लुणावत 
आपण अस्वस्थ होतो तेव्हा आपल्याला नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय आपल्याला जखम होते, तेव्हा त्यावर उपचार करीत असताना आपण श्‍वास रोखून धरतो. श्‍वासाचा वापर करून मानसिक अस्थिरता कमी करण्यासोबतच वेदनेची तीव्रता कमी करता येते. याशिवायही श्‍वसनाचे अनेक फायदे आहेत.  
आपण कधी आपल्या श्‍वासाकडे लक्ष दिले आहे का? श्‍वास ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती चालू राहण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही असे आपल्याला वाटते. पण याच विचारातून आपण आपल्या श्‍वासाकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण आपल्या सध्या सुरू असलेल्या श्‍वसनावर लक्ष केंद्रित केले असता ते खूपच उथळ व वेगाने होत आहे हे आपल्या लक्षात येईल. उथळ श्‍वसनाचे अनेक तोटे आहेत. उथळ श्‍वसन आपल्या शरीराबरोबरच आपल्या मनःस्वास्थ्यावरही परिणाम करते.
या समस्या टाळायच्या असतील तर दीर्घ श्‍वास घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक संशोधनानुसार आपण आपल्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करीतच नाही. त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्‍सिजन मिळत नाही व परिणामी आपल्या तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो. आपण किती हळू व वेगाने श्‍वास घेतो यावर आपले आयुर्मान अवलंबून असते. कबूतर हे सर्वांत वेगाने श्‍वास घेते त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी असते, तर कासव हा सर्वांत दीर्घ व सावकाश श्‍वसन करणारा प्राणी असल्यामुळे तो दीर्घायुषी असतो. आपले उत्तम आरोग्य, संतुलित मनःस्थिती व दीर्घायुष्य यासाठी दीर्घ श्‍वसन करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवायही दीर्घ श्‍वसनाचे अनेक फायदे आहेत. ते पाहण्यापूर्वी दीर्घ श्‍वसन नेमके कसे असते व त्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊ.
दीर्घ श्‍वसन कसे करावे? 
दीर्घ श्‍वसन करण्याचीही एक शास्त्रशुद्ध पद्धती आहे. याद्वारे श्‍वसन केल्यास आपली मनःस्थिती एकदम प्रसन्न होते व शरीरासही त्याचा फायदा होतो. इतर शिस्तीच्या सवयींप्रमाणेच दीर्घ श्‍वसन करण्याचीही शरीराला सवय लावावी लागते. यासाठी रोज थोडा थोडा सराव करणे फायदेशीर ठरते. सर्वप्रथम ताठ बसावे. यानंतर नाकाने हळूहळू प्रथम पोटात हवा भरून, नंतर छातीत हवा भरावी. या सगळ्यादरम्यान हळूहळू 1 ते 5 आकडे मोजावेत. श्‍वास संपूर्ण आत भरल्यानंतर थोडावेळ रोखून धरावा व 1 ते 3 आकडे मोजावेत. यानंतर श्‍वास बाहेर सोडावा व यादरम्यान पुन्हा 1 ते 5 असे आकडे मोजावेत. या सगळ्या दरम्यान श्‍वास हळूहळू आत-बाहेर करीत आहे याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीला आपले मन आपल्या श्‍वासावरून हटेल, पण सरावाने हळूहळू ते जमायला लागेल.
दीर्घ श्‍वसनाचा फायदा मिळवण्साठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून या श्‍वसनाच्या सरावासाठी खास वेळ काढावा. आपल्या दिवसातील 10 मिनिटांचा वेळ काढावा व दिवसातून दोनवेळा हा सराव करावा. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या व्यायामासाठी प्रोत्साहित केल्यास आपल्यासोबतच आपल्या कुटुंबियांनाही याचा फायदा होतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)