“हेल्मेट सक्ती आणि यंगस्टर्स’

पुण्यामध्ये 1 जानेवारी 2019 पासून ‘हेल्मेट सक्तीचा’ निर्णय लागू होणार आहे. पुण्याचा देशातील सर्वाधिक ‘दुचाकी’ वाहने वापरणाऱ्या शहरांमध्ये समावेश होतो. दुचाकी वाहनांची पुण्याच्या रस्त्यांवरील संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अपघातांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. दुचाकी गाडी चालवत असताना हेल्मेटचे महत्व अनन्यसाधारण असल्याने हेल्मेट सक्तीचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. या हेल्मेट सक्तीचे पुणेकर महाविद्यालयीन तरुण-तरुणी कशाप्रकारे स्वागत करीत आहेत जाणून घेऊयात त्यांच्याच प्रतिक्रियांमधून…

एखाद्या ऋतु प्रमाणे येणाऱ्या हेल्मेट सक्तीचे या वेळी सुद्धा स्वागत आहे. स्वतःची सुरक्षा हा ऐच्छिक विषय आहे, मात्र पुण्यातील वाहनाची वाढती संख्या पाहता आणि काही बेशिस्त वाहन चालकांमुळे हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षापासून मी हेल्मेट वापरतो, याच दरम्यान एका अपघातात मध्ये हेल्मेटमुळे माझा जीव वाचला. यावेळी हेल्मेट प्रत्येक दुचाकीस्वाराने वापरणे खरच गरजेचे आहे हे मला जाणवले.आपण कितीही चांगली गाडी चालवत असलो तरी कोण कधी येऊन धडकेल हे सांगता येत नाही, किरकोळ अपघातातुनही डोक्‍याला मार लागू शकतो. यासाठी सर्वानी हेल्मेट सक्तीला सकारात्मकदृष्ट्या घेणे आवश्‍यक आहे.
– विपुल दुलंगे

आज आपण पाहतो अपघातांचे प्रमाण महाराष्ट्रात खुप जास्त वाढले आहे. महाराष्ट्राला अपघातांचे राज्य म्हणून बघितले जात आहे तसेच अपघातांमध्ये डोक्‍याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्या तर लक्षणीय आहे आणि काही अपघातांच्या केसमध्ये डोक्‍याला मार लागून व्यक्ति कोमामध्येही जातात. हेल्मेट असते तर यातील काही जिव वाचू शकले असते असेच म्हणण्याची वेळ आज आली आहे. याच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनवायला हवा. त्यामुळे हेल्मेट सक्ती ही नागरिकांच्या हिताचीच आहे असे म्हणण्यास देखील काही हरकत नाही.
– सुप्रिया साबळे

हेल्मेट सक्तीचा नियम निश्‍चितच स्वागतार्ह आहे. वाहन चालवताना वापरवयाची आवश्‍यक वस्तु म्हणजे हेल्मेट. काही वर्षांपुर्वी औरंगाबादहून केजकडे बसमधून प्रवास करत असताना चित्तेगावजवळ सकाळी दहाच्या सुमारास नुकताच एक अपघात पाहिला. सकाळी ऑफिससाठी निघालेल्या व्यक्तीला शरिराच्या कुठल्याही भागाला जखम झाली नव्हती, मात्र डोक्‍यालाच मार लागल्याने त्या व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला. हळहळण्याचे अजून कारण म्हणजे, त्या व्यक्तीने हेल्मेट सोबत असताना देखील ते डोक्‍यावर न लावता बाईकलाच पाठीमागे लावलेले होते. यामुळे हेल्मेट फक्त पावती चुकवण्यासाठी कॅरी न करता ते वापरले पाहिजे.
– सुगत जोगदंड

सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करणे महत्त्वाचे असून यामुळे फायदाच आहे. अनेकदा दुचाकीवरुन होणारा अपघात किरकोळ असला तरी डोक्‍याला मार लागतो. अशावेळी लोकांना हेल्मेटचे महत्त्व समजते. मात्र, प्रत्यक्षात वापराचे प्रमाण अल्प असल्याने असे प्रकार घडतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटसक्ती गरजेची आहे. मात्र हेल्मेट सक्ती करत असताना तो नियम सर्वांसाठी सारखा असावा कारण अनेकदा नियम लावले जात नाही, मात्र या नियमांचे पालन योग्य पद्धतीत केले जातात नाही आणि अशावेळी अनेकांकडून काही वेळा जास्त दंड आकारण्यात येतो तर काही वेळा कमी दंड आकारण्यात येतो.
– देवेंद्र शिगवण

हेल्मेट सक्ती ही तर आज काळाची गरज आहे. सध्या सोशल मीडिया वर हेल्मेटसक्तीवर होत असलेले विनोद हे नकारात्मक आणि चुकीचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडासा विचार केला तर सहज लक्षात येईल. हेल्मेटमुळे फक्त तुमची सुरक्षितताच नाही तर वाहन चालवताना धुळीचा, प्रदुषणाचा देखील त्रास कमी प्रमाणात होईल. मी स्वतः पुणेकर आहे पण सध्या पुणेरी तिरसटपणा, जाज्वल्य अभिमान थोडासा बाजूला ठेवून हेल्मेटसक्ती सारख्या चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्याची जास्त गरज आहे.
– प्रभुराज कोरे

– प्रीती फुलबांधे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup:
50 :heart:
0 :joy:
100 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)