हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करताना…..

मोबाईल नंबरच नाही तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देखील आपण पोर्ट करू शकतो. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) ने पॉलिसी पोर्ट करण्याची परवानगी दिली आहे. साधारणपणे पॉलिसी पोर्ट करताना पुढील गोष्टींची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. हेल्थ इन्शुरन्स कालमर्यादा संपण्यासाठी किमान दीड महिना शिल्लक असणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी नवीन कंपनी पॉलिसीधारकाचे आरोग्य आणि क्‍लेम हिस्ट्रीच्या आधारावर अर्ज रद्द देखील करू शकतात. नव्या कंपनीने जर पंधरा दिवसाच्या आत प्रतिसाद दिला नाही तर आपली पॉलिसी अमान्य केल्याचे गृहित धरले जाते.

सध्याच्या हेल्थ पॉलिसीबाबत समाधानी नसाल किंवा त्यांची सेवा उपयुक्‍त ठरत नसेल तर आपण त्याच कंपनीची पॉलिसी सुरू का ठेवावी. यापेक्षा चांगली सेवा देणाऱ्या पॉलिसीची निवड करता येणार नाही का, असे असंख्य प्रश्‍न आपल्या मनात घोळत असतात. त्यामुळे आपण पुढील कारणांच्या आधारावर पॉलिसी पोर्ट करायला हरकत नाही. अपुरे कवच, निकृष्ट सेवा, दाव्याची किचकट प्रक्रिया, दावा मिळण्यास विलंब, पारदर्शकतेचा अभाव. या कारणाचा आपला सामना झाला असेल तर आपण पॉलिसी अन्य कंपनीत स्थानांतरित करायला हरकत नाही. यासाठी काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील.

-Ads-

माहिती आणि दावे: वैयक्तिक आणि दाव्यासंबंधीची माहिती अपुरी, अर्धवट भरली आणि ते पडताळणीत निदर्शनास आले तर नवीन कंपनी आपला प्रस्ताव नाकारू शकते. त्यामुळे आरोग्यविषयक सविस्तर माहिती आणि केलेल्या दाव्याची अचूक माहिती कागदपत्रांसह सादर करावी. जेणेकरून पॉलिसी पोर्ट करताना अडचणी येणार नाहीत.

आजाराची माहिती: जर अर्जदाराला सुरुवातीपासून आजार असेल किंवा अन्य आरोग्यविषयक तक्रारी असतील आणि तो सतत दवाखान्यात उपचारासाठी जात असेल तर या कारणावरून नवीन कंपनी आपला पोर्टचा प्रस्ताव फेटाळू शकते. अशावेळी आरोग्य तपासणी करून कंपनीला आजाराची वास्तव माहिती सादर करावी.

पॉलिसीचा लाभ मिळण्याचा कालावधी: आरोग्य विमा हा तीन प्रकारचा असतो. नवीन पॉलिसीचे लाभ मिळण्यासाठी तीस दिवसाच्या कालावधीपर्यंत वाट पाहवी लागते. मूतखड्यासारख्या आजार उपचाराला पात्र ठरण्यासाठी एक किंवा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. कोणताही हेल्थ विमा हा संपूर्णपणे लागू होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी पूर्ण करावा लागतो. अपघात किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये पॉलिसी लगेच लागू होते. मात्र मधुमेह, मुत्रपिंडविकार, हदयविकार यासारख्या आजारांना विमा कवच मिळण्यासाठी काही कालावधी पूर्ण होऊ द्यावा लागतो. जर जुन्या विमा पॉलिसीचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला असेल तर नव्या कंपनीत स्थानांतरित होताना ती पॉलिसी पूर्णपणे लागू होण्यासाठी आणखी एका वर्षाची वाट पाहवी लागेल. एकूण चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आरोग्य विमा पॉलिसी सर्व आजारांना लागू होईल.

जोखिमीची रक्‍कम वाढवताना: जुन्या पॉलिसीतून नव्या पॉलिसीत जाताना आपण विमा कवच वाढवू इच्छीत असाल तर नवीन कंपनी कवच वाढवण्यास सहजासहजी तयार होणार नाही. जर आपण सर्व आजारांना विमा कवच मिळवण्यासाठी निश्‍चित केलेला कालावधी पूर्ण केला असेल आणि यादरम्यान आपण कोणताही उपचार घेतला नसेल तर नवीन विमा कंपनी विमा रक्कम वाढवण्याचा विचार करू शकते. अन्यथा खर्चाची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करते.

वयाची मर्यादा: जर आपले वय 45 पूर्ण झाले असेल तर पोर्ट करताना आपला प्रस्ताव नवी कंपनी नाकारू शकते. त्यामुळे आरोग्य तपासणी करून तो रिपोर्ट विमा कंपनीला सादर केल्यास आणि कंपनीचे समाधान झाल्यास पोर्टची परवानगी मिळू शकते, अन्यथा प्रस्ताव नाकारला जावू शकतो.

हप्त्याची रक्‍कम: विमा कंपनी बदलताना हप्त्याचे आणि विमा कवचचे स्वरुप जाणून घ्यावे. काही ठिकाणी कमी हप्ता असतो, मात्र सुरक्षा कवच समाधानकारक नसते. अशा स्थितीत विमा एजंट किंवा ऑनलाइनवर खातरजमा करून विमा पोर्ट करण्यासाठी चांगली कंपनी निवडावी. अन्यथा आगीतून फुफाट्यात अशी अवस्था होऊ नये.

– जगदीश काळे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)