हेरिटेज आर्ट अँड म्युझिक ऍकॅडमीचे बुधवारी उद्‌घाटन

तळेगाव-दाभाडे (वार्ताहर) – आंबी, ता. मावळ येथील जागतीक मान्यताप्राप्त दि हेरिटेज एज्युकेशन सोसायटीच्या हेरिटेज आर्ट अँड म्युझिक ऍकॅडमीचे उद्‌घाटन बुधवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ संगीतकार व कवी डॉ. अशोक पत्की यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ऍकॅडमीचे प्रमुख कार्यवाह हरिश्‍चंद्र गडसिंग, खजिनदार रामदास काकडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव-दाभाडचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

जगप्रसिद्ध कथ्थक नृत्यकार डॉ. नंदकिशोर कपोते, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार संजय भेगडे उपस्थित राहणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव-दाभाडे येथील सहयोगी आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (संगीत विद्यापीठ) मुंबई यांची मान्यताप्राप्त ऍकॅडमी कला व संगीत क्षेत्रातील सर्व शाखांचे एकाच छताखाली अत्यल्प शुल्कामध्ये आधुनिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव अशासकीय हेरिटेज आर्ट ऍड म्युझिक ऍकॅडमी आहे. यामुळे मावळ तालुक्‍याच्या सांस्कृतिक चळवळीत भर घातली आहे. मावळातील नवोदित कलाकारांना कलेच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

यानिमित्त कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा’ चे विजेते गायक अनिरुद्ध जोशी, मितिलेश पाटणकर, शरयू दाते, रमा कुलकर्णी व बाल गायकांचा सुरेल सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ऍकॅडमी चालू करण्यामागचा उद्देश आज प्रत्येक पालकांच्या समोर एक अत्यंत समस्या आहे. तरुण पिढी टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेम आदी इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्या आहारी गेली आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अहवालात स्पष्ट केले आहे की, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाच्या अती वापरामुळे तरुण मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्‍यात आले आहेत. त्यांच्यात कमालीचा चिडचिडेपणा, मानसिक ताण-तणाव, बेचैनी, अभ्यासातील एकाग्रता नष्ट होणे, लठ्ठपणा, डोळ्याचे व कानाचे विकार, मणक्‍याचे विकार, कॅन्सर व हृदय विकाराचे बळी ठरत आहेत.

“म्युझिक थेरपी’ हा रामबाण उपाय
सगळ्यात मोठा धोका म्हणजे या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमध्ये ते एवढे गुरफटतात की, त्यांना स्वतःचा, कुटुंबीयांचा व सभोवतालच्या विश्‍वाचा पूर्ण विसर पडतो. या सर्वांपासून दूर जात एकलकोंडी होतात. याला प्रभावी उपाय म्हणजे मनोरंजन आणि ज्याच्यामुळे माणसाच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल राखला जातो, ते म्हणजे संगीत. पाश्‍चात्त्य देशात असाध्य रोग बरे करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. मुख्य अभ्यासक्रम शिकता शिकता या ऍकॅडमीतून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीही शाळेत मुलांना घेता येऊ शकते. शासकीय नियमानुसार ऍकॅडमीतून विद्यापीठाच्या तीन परिक्षा उत्तीर्ण झाल्यास किमान 10 गुण आणि 5 परिक्षा उत्तीर्ण झाल्यास 15 गुण त्यांच्या दहावीच्या बोर्डाच्या गुणात वाढ मिळतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)