नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी प्राप्तीकर विभागाला 2011-12 सालचे विवरण दाखवण्यास विरोध करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली आहे. संसदेमध्ये पंतप्रधानांना आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या राहुल गांधी हे प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून मात्र दूर पळत आहेत, असे त्या म्हणाल्या. प्राप्तीकराची विवरणे दाखवल्यावर राहुल गांधी यांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, असा शेराही इराणी यांनी लगावला.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी प्राप्तीकराची विवरणे दाखवण्यास विरोध करणारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. त्या पार्श्‍वभुमीवर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इराणी बोलत होत्या. राहुल गांधी यांच्या प्राप्तीकर विवरणांमध्येच कॉंग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार दडलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
प्राप्तीकर विभागाची नोटीस कोणीही भारतीय नागरिक नाकारू शकत नाही. मात्र राहुल गांधी प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून दूर पळत आहेत. पंतप्रधानांना आलिंगन देण्यासाठी तत्पर असलेले राहुल गांधी प्राप्तीकर अधिकाऱ्यांपासून दूर का पळत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. “यंग इंडिया’ या बिगरव्यवसायिक कंपनीकडून “असोसिएटेड जर्नल्स लि.’ ही व्यवसायिक कंपनी कशी विकत घेतली जाते. या कंपनीचे 90 कोटी रुपयांचे कर्ज केवळ 50 लाख रुपयांना कसे स्वीकारले जाते, याबाबतही इराणी यांनी शंका उपस्थित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)