हॅपी न्यू ईयर स्वागत नववर्षाचे …कोठे कधी …

विविधा अश्‍विनी महामुनी

31 डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. दरवर्षी डिसेंबर संपला की एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते. ही तशी नित्याची गोष्ट आहे. दिवसामागून दिवस जातात, महिन्यामागून महिने जातात, बोलता बोलता वर्ष संपून जाते, नवीन वर्ष सुरू होते. खरं तर त्यात नवीन काही नाही. ती एक जगरहाटी आहे. निसर्गाचे चक्र आहे. पण माणसाला सेलिब्रेट करायला काही तरी निमित्त पाहिजेच असते. अशा अनेक निमित्तांपैकी एक निमित्त म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता नवीन वर्ष किती वेळा सुरू होते? आपल्या भारतीय कालगणनेप्रमाणे फाल्गुन महिना संपला, की चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे पाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते आणि ते आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. आपले भारतीय नवीन वर्ष गुढी पाडवा म्हणजे एक सणच बनला आहे, बनला आहे नव्हे, तर तो आहेच. पूर्वीपासूनच. त्याला आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडवा म्हणजे एक अत्यंत पवित्र दिवस, शुभ दिवस. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र वनवास संपवून, रावणाचा नाश करून अयोध्येत परतले हेते. असे सांगतात. त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणे उभारली जातात. घरात गोडधोड केले जाते.

मोठा आनंदी आनंद असतो. आणि याची सुरुवात अगदी सकाळच्या पवित्र, उत्साहाने सळसळणाऱ्या वेळीच केली जाते. (आणि इंग्रजी न्यू ईयर तर मध्यरात्री, सारे जग झोपलेले असताना साजरे होते.) पहाटे लवकर उठून, स्नान करून गुढी उभारली जाते. त्यासाठी घरातील सर्वच मंडळींचा सहभाग असतो. गुढीला गूळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वजण कडुनिंबाची चारदोन पाने गुळाबरोबर खातात. ते आरोग्यदायी असते. आणखी एक नवीन वर्ष सुरू होते, दिवाळीत. लक्ष्मीपूजनानंतर पाडव्याला व्यापारी लोकांचे, विशेषत: गुजराती आणि मारवाडी बांधवांचे नवीन वर्ष सुरू होते. दिवाळी म्हणजे तर सारा आनंदी आनंदच. मनात मावणार नाही, एवढा आनंद. तामिळनाडूत सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्यानंतर नवीन वर्ष सुरू होते. ते साधारण एप्रिलमध्ये येते.

मल्याळ्म लोकांचा विशू हा नववर्ष दिनही एप्रिलमध्येच येतो. तेलगू व कन्नड लोकांचे नवीन वर्ष उगडी मार्च महिन्यात सुरू होते. पंजाबी बांधवांचे नवीन वर्ष वैशाखी मार्च महिन्यात येते. आपण भारतीय असे वेगवेगळे नववर्ष दिन साजरे करत असलो, तरी जागतिक पातळीवर मात्र 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते. यातही एक गमतीची गोष्ट अशी आहे, की एक जानेवारी जगभरात एकाच वेळी साजरा होत नाही. स्थानिक प्रमाणवेळेनुसार त्यात फरक पडतो. सामान्यत: 31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. रात्री बारानंतर नवीन दिवस आणि नवीन वर्ष सुरू होते. पण जगात सगळीकडे एकाच वेळी बारा वाजत नाहीत.

भारतात आपण रात्री बाराला नवीन वर्षाचा जल्लोष करत असतो, तेव्हा पाकिस्तानात रात्रीचे साडेअकरा वाजलेले असतात. त्यांचे नवीन वर्ष आपल्यापेक्षा अर्धा तास उशिरा, भारतीय वेळेनुसार रात्री साडेबाराला सुरू होते. रेखांशानुसार स्थानिक वेळेत फरक पडत जातो हे आपण शाळेत असताना भूगोल विषयाचा अभ्यास करताना शिकलो आहोत. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात असे शिकल्याचे तुम्हाला आठवत असेलच.

नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा पहिला मान किरिबाती गणराज्याला मिळतो. किरिबाती हे पॅसिफिक महासागरात उष्ण कटिबंधात असलेले एक बेट.आहे. तेथे भारतीय वेळेनुसार 31 डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू होते. त्याच वेळेस समोआ बेटांवर नवीन वर्ष सुरू होते. न्यूझीलंडच्या चाथम बेटावर आपल्या वेळेनुसार 31 डिसेंबरला संध्याकाळी पावणेचार वाजता नवीन वर्षचे स्वागत होते. त्यांच्या वेळेनुसार रात्री बरोबर बारा वाजता सिटी सेंटरच्या स्काय टॉवरवर आतषबाजी केली जाती. हा स्काय टॉवर 328 मीटर्स उंच आहे. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियात नवीन वर्ष सुरू होते. न्यूझीलंड जपानपेक्षा चार तास पुढे आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यात भारताचा क्रमांक 15 वा लागतो. आणि सर्वात शेवटचा नंबर लागतो, तो पॅसेफिक महासागरातील हॉवलॅंड बेटाचा. भारतात 1 जानेवारीचे संध्याकाळचे साडेपाच वाजले असतात, तेव्हा तेथे मध्यरात्र झालेली असते, आणि लोक उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)