हृदय हझारिका, महिला संघाला सुवर्ण

जागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत विक्रमी कामगिरी

चांगवेन: कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. भारताच्या ह्रदय हझारिकाने ज्युनियर गटातील मुलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिक प्रकारातही भारतीय महिलांनी विश्‍वविक्रम प्रस्थापित करताना सुवर्णपदकाची कमाई करीत भारताला दुहेरी सुवर्णयश मिळवून दिले.

यानंतर झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एकेरी स्पर्धेत भारताच्या एलॅवेनिल व्हॅलेरिवनने 249.8 गुणांची कमाई करताना रौप्यपदक पटकावले. याच गटांत चीनच्या शि मेंगयावने 250.5 गुणांची कमाई करत सुवर्णपदक संपादन केले. तसेच केवळ 17 वर्षे वयाच्या श्रेया आगरवालने 228.4 गुणांची नोंद करताना कांस्यपदक जिंकत भारताला दुहेरी यश मिळवून दिले. आजच्या चार पदकांमुळे स्पर्धेच्या सहाव्या दिवसअखेर भारताने 18 पदके जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे. भारताची याआधीची सर्वोत्तम कामगिरी 6 पदकांची होती.

त्याआधी भारताकडून ह्रदय हझारिकाने 10 मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत 627.3 गुण मिळवीत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्‍के केले होते. अंतिम फेरीत शेवटच्या संधीनंतर इराणच्या मोहम्मद आमीर याच्याशी 250.1 गुणांसह बरोबरी झाल्यानंतर सुवर्णपदकासाठी घेण्यात आलेल्या “शूट ऑफ’मध्ये हृदयने बाजी मारली. इराणचा मोहम्मद आमीर 250.1 गुण मिळवीत दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला रौप्यपदक मिळाले तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोवला 228.6 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मात्र 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या पुरुष संघाने निराशाजनक कामगिरी केली. वरिष्ठ गटातील या स्पर्धेत एकाही भारतीय नेमबाजाला अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. भारतीय पुरुष संघ 1872.3 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता संजीव राजपूतला 1158 गुण कमावता आल्याने तो 58 व्या स्थानावर राहिला. स्वप्निल कुसाळेला 1161 गुण मिळाल्याने तो 55व्या स्थानी राहिला, तर अखिल शेवरानने 1167 गुण कमावताना 44वे स्थान गाठले. या तीनही खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने भारतीय संघाला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

एलॅवेनिल व्हॅलेरिवनची दुहेरी कामगिरी

महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारातील सांघिक गटात एलॅवेनिल व्हॅलेरिवन, श्रेया अग्रवाल, मनिनी कौशिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. एलॅवेनिल व्हॅलेरिवनने 631 गुण मिळविताना सर्वोत्तम कामगिरी केली. श्रेया अग्रवालने 628.5 गुण नोंदवले, तर मानिनी कौशिकने 621.2 गुण नोंदवताना सोनेरी यशात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या या कामगिरीने भारतीय संघाने एकूण 1880.7 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यावेळी एलॅवेनिल व्हॅलेरिवनने नोंदविलेल्या 631 गुणांनी ज्युनियर विश्‍वचषकातील नवा विश्‍वविक्रम स्थापित केला. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एकेरीतील रौप्यपदकामुळे एलॅवेनिल व्हॅलेरिवनने एकाच दिवशी दुहेरी पदकांची नोंद केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)