हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग २)

हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण (भाग १)

अवर्षण परिस्थिती व ऊसाला पाण्याचा पडलेला ताण या प्रमुख कारणांमुळे ऊस या पिकावर हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे. हुमणीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या जमिनी, हलक्‍या जमिनी, मुरमाड जमिनी तसेच सखल भागामध्येसुध्दा आढळून येतो आहे. हुमणी ही बहुभक्षीय किड असून ऊस, भुईमुग, हरभरा, कांदा, टोमॅटो, सुर्यफुल, मुग, तूर, सोयाबीन, चवळी, मिरची, बटाटा, आले या पिकांवर तसेच तृणधान्ये, कडधान्य, भीापाला व तेलवर्गीय या पिकांवरसुध्दा हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीला राष्ट्रिय किड म्हणून संबोधले जात असून भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पजांब, हरियाण व आसाम या राज्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे 30 ते 80 टक्‍यांपर्यंत पिकाचे नुकसान होते. 

अ. मशागत
1. हुमणीला कमी बळी पडणा-या फुले 365 या सारख्या वाणांची लागवड करावी. 2. हुमणीग्रस्त क्षेत्रात ऊसाचा खोडवा घेवू नये, तसेच ऊसानंतर सुर्यफुल किंवा भात यासारख्या पिकांची फेरपालट करावी. पिक निघाल्यानंतर त्वरीत रोटाव्हेटरच्या सहाय्याने मशागत करावी 3. हुमणीग्रस्त शेतामध्ये भुईमुग किंवा तागाचा सापळा पिक म्हणून वापर करावा. ऊसाच्या उगवणीनंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमुग अथवा ताग लावावा. कोमेजलेला भुईमुग अथवा तागाच्या झाडाखालील अळ्या नष्ट कराव्यात. 4. खुरपणी, तगरणी अथवा बांधणी अशा मशागतींच्या कामांच्या वेळी बाहेर पडलेल्या हुमणीच्या अळ्या गोळा करुन माराव्यात 5. ऊसाची तोडणी झाल्यानंतर खोल नांगरट करुन शेत स्वच्छ करावे. खोडवा व तणे राहू देवू नये.

-Ads-

6. शक्‍य असल्यास हुमणीग्रस्त शेतात पाणी साचू द्यावे. त्यामुळे वर येणाऱ्या अळ्या पक्षांचे भक्ष ठरतील किंवा हवेअभावी जमिनीतच गुदमरुन मरुन जातील. 7. ऊसाची रुंद सरी किंवा जोड ओळ पध्दतीने लागवड केल्यास वाढलेल्या ऊसात उपाययोजना करणे सोपे जाते. 8. हुमणीचे भुंगेरे सोडून सर्व अवस्था या जमिनीतच वाढत असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीस लिंब, बाभूळ व बोर या झाडांची पाने खाण्यासाठी व मिलनासाठी भुंगेरे येतात. त्यावेळी भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. अंडी घालण्यापुर्वी भुंगेऱ्यांचा नाश केल्यास या किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होते. हा कमी खर्चाचा व सर्वात प्रभावी उपाय आहे. 9. या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट या कालावधीत सामुहिक पध्दतीने एकात्मिक किड व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

ब. जैविक नियंत्रण :
1. बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटॅ-हायझियम ऍनिसोप्ली एकरी दोन लिटर प्रति किलो कंपोस्ट खतात मिसळून ड्रिपदवारे किंवा आळवणी करुन पिकाच्या मुळाला द्यावे. 2. बॅसीलस पॅपीली हा जीवाणू व हेटरोरॅबडेटीस हा सुत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्यामुळे हुमणीच्या नियंत्रणासाठी यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. 3. निंबोळी पेंडीचा चुरा 2 टन प्रती हेक्‍टरी जमिनीत मिसळावा यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
क. रासायनिक नियंत्रण : 1. शेतामध्ये हुमणीची अंडी व अळयांचा प्रसार शेणखत व कंपोस्ट खतांमार्फत होत असल्यामुळे हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी मिथील पॅराथिआनॉची 2 टक्के भुकटी एक किलो प्रती खताची गाडी या प्रमाणात मिसळावे. 2. कडूनिंब किंवा बाभळीच्या झाडावर ईमिडॅक्‍लोप्रीड 17.8 एस एल 0.3 मिली प्रती लिटर या प्रमाणात फवारणी करावी. 3. सप्टेबर व ऑक्‍टोबर मध्ये होणाऱ्या ऊस लागवडीच्या काळात क्‍लोथिऍनीडीन (50 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) 250 ग्रॅम या प्रमाणात वाळूमध्ये मिसळून पिकाच्या मुळाजवळ मातीत टाकावे व नंतर हलके पाणी द्यावे.

4. जून ते ऑगस्ट या कालावधीत मोठ्या ऊसामध्ये 20 टक्के क्‍लोरोपायरीफॉस 5 लिटर प्रती 1000 लिटर पाण्यातून प्रति हेक्‍टर जमिनीतून द्यावे. 5. हुमणीग्रस्त क्षेत्रात 0.3 टक्के फिप्रोनील 20 किलो किंवा फोरेट 10 जी 25 किलो किंवा कार्बोपयुरॉन 3 जी 15 किलो प्रती हेक्‍टरी या प्रमाणात सरीमध्ये शेणखतातून द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे. लावणीपुर्वी ऊसाच्या टिपऱ्या 10 मिनीटे ईमिडॅक्‍लोप्रीड 17 एस.एल. 5 मि.ली. किंवा थायामिथोक्‍झाम 25 डब्ल्यू.जी. 5 ग्रॅम किंवा मेलॅथिऑन 35 ई.सी. 20मिली किंवा ईमिडॅक्‍लोप्रीड + फिप्रोनील 80 डब्ल्यू.जी. 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड केल्यास हुमणीच्या अळयांचे नियंत्रण होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)