बिजवडी- हुमणी किडीमुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे करोडोंचे नुकसान झाले आहे, या वर्षी जर हुमणी आटोक्‍यात आली नाही तर पुढील वर्षी उसाचे तीस टक्केच उत्पादन निघेल, त्यामुळे साखर कारखाने चालणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. म्हणूनच राज्याच्या कृषी खात्याने यावर त्वरीत उपाययोजना करून ही लागलेली कीड नष्ट करावी, अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पाटील यांनी गुरुवारी (दि. 13) सायंकाळी राजेवाडी येथील शेतकरी हिराजी केरू मोरे या शेतकऱ्याच्या पाऊण एकर उसाला लागलेल्या हुमणीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी साखर कारखान्याच्या वतीने कृषी तज्ज्ञांना बोलावून शेतकऱ्यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत आहोत. या किडीवर काय उपाययोजना करावयाची, कोणते औषध मारावयाचे याबद्दलची माहीती शेतकऱ्यांना देत आहोत. यावेळी कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक हनुमंत बोडके, प्रशांत मोरे उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे शेतकी विभागाच्या वतीने शेतकी अधिकारी शिंदे यांनी हुमनी विषयी माहिती दिली.
पाटील पुढे म्हणाले या वर्षी इंदापूर तालुक्‍याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने उसाला हुमणी लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. ऊस पिकासाठी घेतलेले कर्ज परत कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. उस पाहणीच्या वेळी पाटील यांच्याबरोबर कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी यादव, कारखान्याचे संचालक भरत शहा, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, कार्यालयीन अधीक्षक शरद काळे, शेती अधिकारी शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)