हुतात्मा स्मारके प्रेरणापीठ बनावीत

हुतात्मा दिन अभिवादन सोहळ्यात ना.बानुगडे-पाटील यांचे आवाहन

पुसेसावळी – देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेवून समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी, यासाठी हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळे आहेत. इथे नतमस्तक होवून युवा पिढ्यांनी इथ हुताम्यांचे आत्मचरित्र वाचावीत. यासाठी इथे वाचनासाठी पुस्तक उपलब्ध करावीत. त्यामाध्यमातूनच हुतात्मा स्मारके नवीन पिढीसाठी प्रेरणापीठ बनावीत, असे मत कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.

हुतात्मा खाशाबा शिंदे सांस्कृतिक व सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 9 सप्टेंबर हुतात्मा दिन अभिवादन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वर्धन ऍग्रो चेअरमन धैर्यशील कदम, जिल्हा शिवसेना प्रमुख हर्षद कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष सचिन नलावडे, क्रांतिसिह नाना पाटील यांचे पणतू सागर पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कदम,संभाजी शिंदे, तहसिलदार जयश्री आव्हाड, नायब तहसिलदार मीना निंबाळकर तसेच हुतात्मा व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले.

ना. बानुगडे-पाटील म्हणाले, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे बिरुद अभिमानास्पद आहे. या जिल्ह्यातील शेकडो सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढले. ते आमची कायमची प्रेरणा आहेत. म्हणून आम्ही जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांना निधी देवून त्याच्या नुतनीकरणाची कामे केली आहेत. या स्मारकांमध्ये विविध हुतात्म्यांचे चरित्र, त्यांच्या शौर्यकथा असलेले साहित्य ठेवले जावे, यातून युवकांना नवी प्रेरणा मिळण्यास उपयोग होइल. ही भूमी छत्रपतींची आहे. प्रती सरकार स्थापन करणाऱ्या नाना पाटलांची, महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आहे. त्यामुळे फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारे काम या भूमितून झाले असल्याचे गौरवोद्गार ना.बानुगडे-पाटील यांनी काढले.

या प्रसंगी ना.बानुगडे-पाटील यांच्या हस्ते हुतात्मा आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी वर्धन ऍग्रो चेअरमन धैर्यशील कदम म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा दिनाचे महत्व खुप मोठे आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जे प्रती सरकार निर्माण केले होते, त्यामुळे ब्रिटीशांविरोधात जनसामान्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. अनेकांनी प्राणाची बाजी लावून हा लढा लढला. त्यांची प्रेरणा म्हणून हुतात्मा स्मारके उभी आहेत. अशा हुतात्म्यांच्या भुमीत जन्माला आलो ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना सहकार्य करू, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अक्षय ब्लड बॅंकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दादासो कोकाटे, महेश घार्गे, इस्माईल संदे, नितीन वीर, अमोल कदम, नितीन भोसले, आनंदा शिंदे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अब्दुल शिकलगार व आभार सुहास शिंदे यांनी मानले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)