हुक्‍क्‍याची हाव, ‘चायना पेन’ला भाव!

राज्य सरकारचा “हुक्‍का बंदी कायदा’ बासनात


चीनी दलालांनी शोधली संधी; हुक्‍का पेन बाजारात


ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना लागले व्यसन

– संजय कडू

पुणे – राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. सिगारेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003 कायद्याचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या हुक्‍का बंदीतही चीनी कंपन्यांनी संधी शोधली आहे. चायनाने मोठ्या प्रमाणात “हुक्‍का पेन’ बाजारात आणले आहेत. यामुळे सिगारेट सारखे भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरीही बंदी असतानाही हुक्‍क्‍याचे सेवन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शालेय मुलांमध्ये याची मोठ्या प्रमाणात “क्रेझ’ वाढू लागल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बंदी आणण्याचे कारण काय?
मुंबईतील लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर 2017 मध्ये हुक्‍का पार्लरमुळे आग लागून 14 लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर ही बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हुक्‍का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याआधी गुजरातने हा कायदा लागू केला आहे. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात हुक्‍का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. एप्रिलमध्ये 2018 मध्ये हे विधेयक विधिमंडळात पारित झाले. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली.

कायद्यावरून प्रशासनातच दुमत
पुणे शहरातही मध्यंतरी मोठ्या प्रमाणात हुक्‍का पार्लर सुरू झाले होते. केवळ “शॉप ऍक्‍ट’ परवाना काढून ही “दुकाने’ सुरू झाली होती. हुक्‍का पार्लरबाबात अन्न औषध प्रशासन आणि पोलीस यांच्यात एकमत नव्हते. नक्‍की कोणता कायदा हुक्का पार्लरला लागू होतो व कोणी कारवाई करायची असा विषय होता. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, चांदणी चौक, बावधन आदी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लरचे प्रस्थ वाढले होते. काही हॉटेलांनी त्यांच्या आवारात हुक्‍क्‍यासाठी वेगळी व्यवस्थाही केली होती.

तरुणाई दुप्पट वेगाने विळख्यात
महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये याची “क्रेझ’ मोठ्या प्रमाणात वाढली होती. यातील काही ठिकाणी हुक्‍क्‍याद्वारे अंमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याचे प्रकार घडत होते. दरम्यान, राज्य सरकारने हुक्‍का बंदी लागू केल्यावर हुक्‍क्‍याच्या व्यसनातून तरुण पिढी बाहेर पडेल, असे वाटत होते. मात्र, हुक्‍का बंदीनंतर ती आता ती हुक्‍क्‍याच्या व्यसनात दुप्पट वेगाने अडकत चालली आहे.

ग्रामीण भागातील पालक चिंताग्रस्त
आता हुक्का पार्लरच मुलांच्या खिशात सामावले गेले आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात “हुक्‍का पेन’ बाजारात दाखल झाले आहेत. अवघ्या 300 ते 350 रुपयांत हा पेन उपलब्ध होत आहे. शिवाय, त्यामध्ये “रिफीलिंग’ही करता येतो. वेगवेगळ्या “फ्लेवर’च्या “रिफील’चे पॅक सोबत उपलब्ध होते. पान टपऱ्यांवर सर्रास हा हुक्का पेन उपलब्ध आहे. ई-सिगारेटबरोबरच या पेनचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे बारामती, इंदापूर आदी तालुका भागात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी सर्रास याच्या आहारी गेले आहेत. अनेक शालेय मुलांच्या दप्तरामध्ये “हुक्‍का पेन’ आढळल्याच्या तक्रारी शिक्षकांनी पालकांकडे केल्या आहेत.

हुक्‍का पार्लर आता आलिशान सदनिकांतही
राज्य सरकारने केलेल्या हुक्‍का पार्लर बंदीनंतर हुक्‍का व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय थेट आलिशान सदनिकांमध्ये “शिफ्ट’ केला आहे. कोरेगाव पार्क, चांदणी चौक आदी ठिकाणी हायप्रोफाइल सोसायट्यांमधील सदनिकांत हा व्यवसाय चोरी-छुपे किंवा खादीच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे पान टपरीवर सर्रास हुक्‍का पिण्याचे साहित्य आणि फ्लेवर्स विक्री केले जात आहेत. यामुळे हुक्‍का बंदी केवळ नावालाच असल्याचे दिसते.

हुक्‍का पेन मोठ्या प्रमाणात बाजारात सर्रास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे पेन 300 ते 500 रुपयांना उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचे व्यसन वाढत असून तेथील पालक मुलांना समुपदेशनासाठी घेऊन येत आहेत. यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे
– अजय दुधाणे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)