हुंडाबळी घटनेत आई-वडिलांच्या साक्षीला महत्त्व

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय मनोहर सप्रे व न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने मागच्या आठवड्यात दिनांक 7 जानेवारी 2019 ला महादेवाप्पा विरुद्ध कर्नाटक राज्य या हुंडाबळीच्या खटल्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आरोपी पतीला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम केली. आई वडिलांच्या साक्षीला महत्त्व दिले गेले पाहिजे असे मत नोंदविले आहे. या निकालाने बरेचदा हुंडाबळी प्रकरणातील प्रत्यक्ष घटनास्थळीचा साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावे व आई वडिलांच्या साक्षीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

पोलिस शिपाई असलेल्या महादेव आप्पा व त्याच्या भावाबरोबर मृत पत्नीचे व तिच्या बहिणीचे लग्न झाले होते. दोन सख्या बहिणी जावा जावा होत्या. मृत रुक्‍मिणी बाईचा पती दारूचा व्यसनी होता. पत्नीलाही तो दारू पिण्यासाठी जबरदस्ती करुन तिला नृत्य करायला लावायचा व माहेरहुन चार-पाच हजार रुपये घेऊन येण्यासाठी जबरदस्ती करायचा, असे तिच्या वडिलानी त्यांच्या साक्षीत सांगितले होते. दोन वेळा दोन हजार रुपये प्रत्येक वेळी दिले. मात्र तिसऱ्या वेळेला वडिलानी रक्कम देण्याचे टाळले. तिने आपल्या जीविताला धोका असून माहेरीच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, गावातील जेष्ठांच्या मध्यस्थीने ती सासरी गेली होती. रुक्‍मिणीने माहेरी वडिलांना त्याच्या छळाचे पत्र पाठविले, त्यावेळी तिची आई व चुलती तिला भेटण्यास गेल्या तर त्याना रुक्‍मिणीला भेटू दिले नाही व त्यांना वाईट वागणूक देऊन आरोपीने बुटाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याची त्या दोघीनी पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठांना माहिती देऊन व्यवस्थित वागण्यास सांगितले. त्यानंतर त्या दोघींनी घरी भावाला याबाबत माहिती दिली. त्याने याबाबत रुक्‍मिणीला विचारले असता तिने आपल्याला तीन हजार रुपयांची मागणी केली व जर रक्कम मिळाली नाही तर मी माहेरी येईन असे सांगीतले. त्यानंतर आठच दिवसांत ती भाजल्याचे वृत्त समजले. दवाखान्यात तिने वडिलाना सांगितले की माझ्यावर रॉकेल ओतून माझ्या पतीने मला पेटवले आहे व त्याच दिवशी ती मृत झाली. आईची साक्ष सदर पुराव्याला मदत करणारी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच अपीलकर्त्याचा भाऊ जो मृत रुक्‍मिणीच्या बहिणीचा पती होता त्याने ही मान्य केले होते की आरोपी पत्नीला मारहाण करीत असे व एकदा एका नातेवाईकाजवळ देखील तिने आपल्याला होणाऱ्या छळाची माहीती दिली होती. त्याची साक्ष देखील मदतीची ठरते. तिला मारले त्या दिवशी घरी दोघेच होते, ओव्हनला साडी लागून ती पेटली हा बचाव खोटा ठरत असून उत्तरीय तपासणीत रॉकेलचा वास शरीराला होता ही बाब महत्त्वाची असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

कोणतीही नवविवाहिता आपले वैवाहिक समस्या आई वडिलाजवळ सर्वात अगोदर सांगतात. कारण त्यांच्याइतके जवळचे त्यांना कोणी नसते त्यामुळे आई वडिलांच्या साक्षीला महत्त्व दिले पाहिजे, ते विनाकारण का खोटे बोलतील, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. हुंड्यासाठी वारंवार मागणी केल्याचे पुरावे स्पष्ट आल्याने कलम 498 सह खुनाचे कलम 302 योग्य असून न्या. अभय सप्रे व न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने पुराव्याचा विचार न करता जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तीचा दिलेला निर्णय चुकीचा होता. उच्च न्यायाल्याने हा निकाल रद्द करून आरोपीला जन्मठेपेची दिलेली शिक्षा कायम केली. त्यामुळे आई वडिलांच्या साक्षीचे महत्त्व अधोरेखित केले.

बरेचदा चार भिंतीच्या आत या घटना घडल्याने प्रत्यक्ष घटना स्थळावरचा साक्षीदार मिळणे अशक्‍य असते त्यामुळे या निकालाचा बहुतांश पीडिताना नक्की फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)