ही बाजी की लोटांगण? (अग्रलेख)

बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात काल भाजप आणि संयुक्‍त जनता दल अर्थात जेडीयू या पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीचे यशस्वी जागावाटप झाले. अमित शहा, नितीशकुमार आणि रामविलास पासवान या नेत्यांनी आपसात समझोता करून जागावाटप निश्‍चित केले आणि तशी रितसर घोषणाही केली. आता भाजपने ही आघाडी करून बाजी मारली की बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी नितीशकुमारांपुढे लोटांगण घातले, यावर जोरदार दावे-प्रतिदावे सुरू होतील. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. त्यापैकी 17 जागा भाजप आणि 17 जागा जेडीयू लढवणार आहे. पासवान यांच्या लोकजनशक्‍ती पक्षाला सहा जागा मिळणार आहेत. असा फॉर्म्युला कालच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आला.

सत्तेवर असलेल्या आघाडीने देशातल्या एका मोठ्या राज्यात तडजोडीने जागावाटप जाहीर करणे, ही मोठी राजकीय आघाडी आहे, असा दावा भाजपचे नेते आता करू लागतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आज बिहारमध्ये भाजपच्या लोकसभेतील विद्यमान सदस्यांची संख्या 22 इतकी आहे. असे असताना त्या पक्षाला केवळ 17 जागांवर बिहारमध्ये समाधान मानावे लागले आहे. मुदलातच घट स्वीकारावी लागणारी ही तडजोड आहे. भाजपसारख्या दरारा राखून वागणाऱ्या पक्षाला महत्त्वाच्या राज्यात अशी नमती भूमिका घ्यावी लागत असेल तर त्याची कारणमीमांसाही महत्त्वाची ठरते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी निराशाजनक ठरली. तशातच त्यांना त्यांच्या हातात असलेल्या तीन महत्त्वाच्या राज्यांत थेट कॉंग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्‍वभूमीवर, त्यांना एनडीएची आठवण झाली आणि त्यांना ती मजबूत करण्याची आवश्‍यकता वाटू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिहारमधल्या जेडीयू आणि लोकजनशक्‍ती या पक्षांनीही भाजपची अडचण ओळखून त्यांना पद्धतशीरपणे कोंडीत पकडले. नितीशकुमार यांनी तर वातावरणच असे तयार केले होती की ते भाजपला तलाक देऊन आपला स्वत:चा वेगळा मार्ग चोखाळू शकतील. त्यातच रामविलास पासवान यांनीही आपल्या मुलाकरवी भाजपला आव्हान देणारी निवेदने जारी करून भाजपला दमात घेतले. पासवान यांचे चिरंजीव चिराग हेही सध्या लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी जेटली यांना पत्र लिहूनच नोटबंदीने नेमके काय साधले गेले, ते जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी भाजपला आव्हान देणारे संदेशही प्रसिद्धीला दिले होते. त्यामुळे अमित शहा यांची निश्‍चित पळापळ झाली असणार. बिहारमधील एनडीएतून राष्ट्रीय लोक समता पार्टी नुकतीच बाहेर पडली आहे. या पक्षाने भाजपला सोडचिठ्ठी देत सरळ कॉंग्रेस आघाडीचा रस्ता धरला आहे. त्यामुळेही भाजपचे नेतृत्व धास्तावले होते. तशातच त्यांना जेडीयू आणि लोकजनशक्‍ती पार्टी दुरावण्याचीही धास्ती वाटू लागली होती. त्यामुळे त्यांना नमते घेत बिहारमध्ये ही राजकीय तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे भाजपने बिहारमध्ये बाजी मारली या दाव्याचा पोकळपणा उघडा पडतो.

अर्थात तेवढ्याने एनडीएचे काम सोपे होण्याऐवजी आणखीनच अवघड बनण्याचीही धास्ती आहे. कारण बिहारमधील छोट्या पक्षांनी जसे भाजप नेतृत्वाला कोंडीत पकडून आपल्या जागा वाढवून घेतल्या, तोच कित्ता अन्य राजकीय पक्षही गिरवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विशेषत: महाराष्ट्रात शिवसेनेला आता त्यामुळे मोठे बळ मिळण्याची शक्‍यता आहे. मुळात शिवसेनेने अजून भाजपबरोबर राहायचे की नाही, हेच अजून ठरवलेले नाही. या पक्षाने जर शेवटपर्यंत ताणून धरले तर बिहारच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही शिवसेना जादा जागा पदरात पाडून घेऊ शकेल. त्या खेरीज एनडीएमध्ये पंजाबमधील अकाली दल हा आणखी एक मोठा राजकीय पक्ष उरतो. त्यांच्याशीही अशीच तडजोड होऊन पंजाबमधील जागांचा प्रश्‍न निकाली निघू शकतो. पण बाकी देशात भाजपला अन्य कोणत्याही पक्षाची समर्थ साथ मिळण्याची शक्‍यता नाही. तेथे त्यांना एकट्याच्याच बळावर लढावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. आता तेथे आघाडी करावा असा तिसरा प्रबळ पक्षच उरलेला नाही.

दक्षिणेत भाजपला फारसा वाव नाही. तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटकात भाजपपुढे आव्हानात्मक स्थिती आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असला, तरी अजून त्यांना तेथे बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे भाजपला सध्या ही जी पडती भूमिका घेऊन अन्य पक्षांबरोबर तडजोड करावी लागत आहे, त्या स्थितीला त्यांचे एककल्ली धोरणच कारणीभूत ठरले आहे. एकटा भाजपच सर्व काही करण्यास समर्थ आहे अशा थाटात ते गेली साडेचार वर्षे वावरले. त्यांनी एनडीएतील घटक पक्षांची कधीच फिकीर केली नाही. लेखक मेघनाद देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे मोदींना आपली टीम तयार करता आली नाही आणि टीमला बरोबर घेऊन त्यांना राज्यकारभार करता आला नाही. त्यामुळेच अमित शहा यांना अन्य पक्षांशी नमते घेण्याची वेळ आली आहे. भाजपने एनडीएचे टीम स्पिरीट कायम ठेवून जर राज्यकारभार केला असता, तर त्यांच्यावर आज ही नमते घेण्याची वेळ आली नसती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)