…ही तर दिवा विझण्यापूर्वीची फडफड!

पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचे वक्तव्य म्हणजे दिवा विझण्यापूर्वीची फडफड आहे, अशा तीव्र शब्दात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रत्युत्तर दिले.

मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ पवार यांना उतरविण्याच्या हलचाली सुरु असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत बारणे यांना छेडले असता ते म्हणाले की, कोण पार्थ पवार मी त्यांना ओळखत नाही. तो केवळ “पोस्टर बॉय’, पवारांचा मुलगा एवढीच त्याची ओळख असल्याची टीका बारणे यांनी केली होती. या टीकेला दत्ता साने यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साने म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार बारणे यांचा प्रभाव संपत आला आहे. पार्थ पवार यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांचे केवळ फलक परिसरात लागले होते. एवढ्यावरच बारणे यांच्या पायाखालची वाळू सरकली. अद्याप पार्थ यांच्या उमेदवारीची चर्चा देखील नाही. असे असतानाच बारणे यांनी त्यांची धास्ती घेतली आहे.

खासदार यांनी त्यांच्या साडेचार वर्षाच्या कालावधीत खासदार निधीतून एकही ठोस कामकाज केले नाही. याचा जनता देखील विचार करणार आहे. हे केवळ दिल्लीच राजकारण बघतात. पण ज्या गल्लीतून हे निवडून गेले त्याचा त्यांना विसर पडला आहे. त्याची कल्पना त्यांनाही आली आहे. त्यामुळेच ते असे वक्तव्य करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे यावेळी 100 टक्‍के डिपॉझिट जप्त होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे दुसरे खासदार रेड झोन व बैलगाडा या दोन मुद्यावर किती वर्षे निवडून येणार, असा उपरोधिक सवाल त्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता केला. शिवसेनेने पवार व राष्ट्रवादीला आव्हान करु नये. संपूर्ण देशाला पवार घराण्याची माहिती आहे. शिवाय बारणे यांनाही कधी काळी त्या घराण्याने पाठबळ दिले आहे. त्यामुळे त्याच घराण्यातील नातूची ते ओळख विसरत असतील ते हास्यास्पद आहे, असे दत्ता साने म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)