हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा; मुंबई-जमशेदपूर लढत बाद फेरीसाठी महत्त्वाची

पुणे- हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील उद्या (गुरुवार) होणाऱ्या लढतीत मुंबई सिटी एफसी संघासमोर जमशेदपूर एफसी संघाचे कडवे आव्हान आहे. ही लढत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

गुणतालिकेत जमशेदपूर पाचव्या, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. उद्याच्या सामन्यात जिंकणाऱ्याची आगेकूच करण्याची संधी वाढेल, तर हरणाऱ्याची कमी होईल, याची दोन्ही संघांना जाणीव आहे. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्नांत कोणतीही कमतरता पडू देणार नाहीत. जमशेदपूरचे 13 सामन्यांतून 19 गुण झाले आहेत. जिंकल्यास ते एफसी गोवा संघाला मागे टाकून चौथा क्रमांक मिळवू शकतील. गोव्याचे दोन सामने कमी आहेत.

-Ads-

जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, जमशेदपूरमधील लढतीत किती चुरशीचा खेळ होऊन 2-2 अशी बरोबरी झाली हे तुम्ही पाहिले आहे. दोन्ही संघांना जिंकायचे होते. मुंबई फुटबॉल ऍरेनावर उद्या होणाऱ्या सुद्धा अशीच चुरस होईल. जिंकल्यास मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्याच्याच प्रयत्नात असतील.

ही लढत म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न नसल्याचे कॉप्पेल यांनी स्पष्ट केले, पण जिंकल्यास बराच फायदा होईल हे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की, दोन्ही संघांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न नाही. आमचे पाच सामने बाकी आहेत. हा सामना हरलो तरी आम्ही बाद फेरी गाठू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे, पण तसे झाल्यास मार्ग जास्त अवघड असेल. आता खूप काही पणास लागले आहे. ही परिस्थिती जीवन-मरणाचा प्रश्न नसली तरी जवळपास तशीच आहे.

मुंबईने गोव्यावर गोव्यात 4-3 असा अप्रतिम विजय मिळविला. बलवंत सिंगने अंतिम टप्यात निर्णायक गोल केला. या विजयामुळे मुंबईला संजीवनी मिळाली असून 12 सामन्यांतून त्यांचे 17 गुण झाले आहेत. बाद फेरीसाठी मुंबईचे आव्हान अजूनही कायम आहे.

मुंबईचे प्रशिक्षक अलेक्‍झांड्रे गुईमाराएस म्हणाले की, अशा प्रकारच्या लढतींमध्ये प्रत्येक तपशील निर्णायक ठरतो. जमशेदपूरचा संघ प्रतिस्पर्ध्याचे जास्त गोल होऊ देत नाही. आम्हाला मिळणाऱ्या संधीचा फायदा उठविण्यासाठी प्रत्येक वेळी फार अचूक खेळ करावा लागेल. आमच्या बचाव फळीला फार दक्ष राहावे लागेल. मागील सामन्यात त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला. हा सामना अवघड असेल.

मुंबईला घरच्या मैदानावर मागील दोन सामने गमवावे लागले. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध ते 0-1, तर बेंगळुरू एफसीविरुद्ध 1-3 असे हरले. हे पराभव होण्यास कारणीभूत ठरलेल्या त्रुटींची गुईमाराएस यांना जाणीव असून त्या दूर करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत.

मुंबईसाठी कर्णधार ल्युचीयन गोएन आणि ब्राझीलचा मध्यरक्षक लिओ कॉस्टा यांना आधीच्या सामन्यात दुखापतींमुळे खेळता आले नाही. आता इतके काही पणास असलेल्या लढतीत हे दोघे खेळू शकतील अशी गुईमाराएस यांना आशा आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)