…हीच मोठी देशभक्‍ती ठरेल – राजेंद्र निंभोरकर

पिंपरी – लष्करी जीवनाप्रमाणेच सामान्य नागरी जीवनामध्येही शिस्त आणि वक्तशीरपणा यांची जोपासना करणे गरजेचे आहे, किंबहुना तसे झाल्यास हीच मोठी देशभक्ती ठरू शकते, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अर्थात आयआयएमएसच्या वतीने आयोजित सर्जिकल स्ट्राईक स्मृती दिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना बोलत होते. आयआयएमएसचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. भरत कासार, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. संतोष शिंदे, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटचे प्रा. श्रेयस सोहनी, माजी महापौर मुरलीधर ढगे, प्रताप भोसले, लेखक महेश नरवडे आदी उपस्थित होते. प्रतिभा इन्स्टिट्यूट, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जेएसपीएम या संस्थांचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

-Ads-

याप्रसंगी राजेंद्र निंभोरकर यांनी आपल्या लष्करी कारकीर्दीतील तवांग व कारगिल येथील अनुभव सांगितले. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताची प्रतिमा ही फक्त बचावाची भूमिका घेणारा देश अशी केली होती. मात्र, वेळप्रसंगी सडेतोड उत्तर देण्याची भारतीय सैन्याची तयारी असते, हा संदेश सर्जिकल स्ट्राइकमधून देण्यात आला. सर्जिकल स्ट्राइक ही अत्यंत योजनाबद्ध रितीने राबविलेली धाडसी मोहीम होती. त्याद्वारे पाकिस्तानला व एकंदरीतच जगाला संदेश दिला गेला, की भारतसुद्धा अशा प्रकारचे पराक्रम करू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही आजही आम्हा लष्करी जवानांसाठी मार्गदर्शक ठरते. त्यामुळे मराठ्यांचा हा जाज्वल्य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्यातील जवानांकडे असलेली देशाप्रतीची निष्ठा, प्रसंगी प्राणार्पण करण्याची तयारी हे गुण एकीकडे असताना दुसरीकडे सामान्य नागरी जीवन जगत असताना प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये विशेषतः युवकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे गरजेचे आहे.
सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. तर पवन शर्मा यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)