हिवाळ्याच्या तोंडावर पावसाळी साहित्य

तुषार रंधवे

पिंपरी – राज्यातून पाऊस परतीच्या प्रवासाला लागला आहे. मात्र, आता कुठे महापालिका कर्मचाऱ्यांना पावसाळी साहित्य वाटप करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पावसाळा संपल्यानंतर रेनकोट घालून या कर्मचाऱ्यांनी काम करायचे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या कार्यतत्परतेची करावी तेवढी प्रशंसा थोडीच असल्याची टीका होत आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवरील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पावसाळी साहित्याचे वाटप केले जाते. याशिवाय उद्यान व विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामानुसार त्यांना देखील हे साहित्य पुरविले जाते. याकरिता दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात स्वेटर वाटपाचा तत्कालीन शिक्षण मंडळाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता भांडार विभागाच्या वतीने केल्या गेलेल्या पावसाळी साहित्याचे पाऊस संपल्यानंतर वाटप सुरु करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपूर्वी निकृष्ट पावसाळी साहित्य खरेदी होत असल्याचे आरोप होत असायचे. त्यामुळे कर्मचारी महासंघाने कर्मचाऱ्यांना वाटप केल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर या साहित्याच्या दर्जाबाबतच्या तक्रारी येत नसल्याची परिस्थिती आहे. भांडार विभागाने खरेदी केलेल्या साहित्याची तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 24 सप्टेंबरपासून सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत विभागांनी डिमांड चलन सादर करणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या नेहरूनगर येथील गोदामातून या साहित्याचे वाटप सुरु आहे.

20 लाखांची गमबूट खरेदी
पावसाळी साधनांतर्गत 2 हजार 722 नग गमबूट खरेदी करण्याची ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत एकूण तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी चिंचवड येथील मे. गोल्ड पिलर असोसिएटस्‌ यांनी प्रति नग 739 रुपये दराने सर्वात कमी दराने निविदा भरली होती. 20 लाख 11 हजार 558 रुपये खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली होती. या खर्चाला स्थायी समितीच्या 25 जुलै 2018 च्या साप्ताहिक सभेत मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय 4 हजार 809 रेनसूट व रेनकोट खरेदीसाठी महापालिकेने 45 लाख 23 हजार 867 रुपये खर्च केले आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी “ब्रॅण्ड’ची खरेदी
खरेदीचा विषय आला की, ओळखीच्या अनेक जणांकडून विशिष्ट ठेकेदाराकडून माल खरेदी करण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे संशय निर्माण होऊ नये, याकरिता उत्कृष्ट दर्जा असलेल्या मालाची खरेदी करण्याचे कर्मचारी महासंघाच्या समितीकडून सुचविले जाते. त्याकरिता कर्मचाऱ्यांना रेमंड या नामांकीत कापड कंपनीचे कापड दिले जाते. याशिवाय सर्व पावसाळी साहित्य खरेदी करताना देखील हा निकष पाळला जातो.

पावसाळी साधने कर्मचाऱ्यांना दोन वर्षांतून एकदा वाटप केली जातात. महिला कर्मचाऱ्यांना गमबूटाऐवजी चपलेचा एक जोड दिला जातो. त्यामुळे ती साधने दोन वर्षांत केव्हा वाटप करावीत, याचा कालावधी ठरलेला नसतो. याशिवाय दिवाळीपूर्वी कामगारांना गणवेशाचे कापड व महिलांना साडी वाटप केले जाते. यंदा मात्र, गमबूट पसंत केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याची मुंबईत पाठवून शासकीय संस्थेकडून दर्जाची तपासणी होते. यंदा या तपासणीला दीड महिना उशिर झाल्याने हे वाटप विलंबाने होत आहे. मात्र, ही पावसाळी साधने दोन वर्षे वापरली जात असल्याने विलंबाने झालेल्या वाटपाचा यावर परिणाम झालेला नाही.
– बबन झिंजुर्डे,
अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)